Saturday, April 27, 2024
Homeनगरकोरोनाच्या धास्तीने गावागावात ‘नो एन्ट्री’चे फलक

कोरोनाच्या धास्तीने गावागावात ‘नो एन्ट्री’चे फलक

क्वारंटाईन असलेले विनाकारण फिरत असल्याने ग्रामस्थांचा निर्णय

अहमदनगर (वार्ताहर) – नगर तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध गावांनी गावात येणारे रस्ते बंद करुन ‘नो एन्ट्री’चे लावले आहेत. विनाकारण फिरणार्‍यांना वैतागून गावांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

- Advertisement -

जेऊर परिसरातील चापेवाडी, नगरजवळील गजराजनगर, वडगाव गुप्ता येथील रस्ते बंद करण्यात आले आहेत. यापूर्वी धनगरवाडी, शेंडी गावातील रस्ते बंद करुन प्रवेश निषिद्धृ असे फलक लावण्यात आले होते. रस्ते बंद करण्याचे लोन आता तालुक्यात वेगवेगळ्या गावात पोहचल्याचे दिसून येत आहे. डोंगरगण ग्रामस्थांनी तर गावाला जोडणारे सर्वच रस्ते चर खोदुन बंद केले आहेत.

अत्यावश्यक सेवेसाठी एक रस्ता मोकळा ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागात मुंबई, पुणे व इतर भागातून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. प्रशासनानेे त्यांची यादी तयार करुन त्यांना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत. होम क्वारंटाईनबाबत हातावर शिक्के मारलेले आहेत. तरी देखील अनेक ठिकाणी हे लोक उघडपणे फिरत असल्याचे चित्र पाहवयास मिळते.

जेऊरमध्ये बाहेरगावांवरुन आलेले सुमारे 130 जणांना होम क्वारंटाईन केले होते. ग्रामीण भागात अनेक जण किराणा, औषधे, दूध याच्या नावाखाली फिरताना दिसून येतात. त्यामुळेच नागरिकांनी संतापून गाव, वाड्या वस्त्यांवरचे रस्ते बंद केल्याचे सांगितले जाते.

‘दुधवाले काका’ येणार का ?
नगर शहराला दूध पुरवठा करणारे नगर ग्रामीणमध्ये जास्त प्रमाणात आहेत. दररोज सकाळी मोटारसायकलवर दोन्हीकडे दुधाचे कॅन अडकवून हे ‘दुधवाले काका’ शहरात घरोघर दूध वाटप करत असतात. मात्र अनेक गावांचे रस्ते बंद करण्यात आल्यामुळे या दुधवाल्या काकांना नगरपर्यंत पोचण्यास अडचणी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

घरात थांबणे गरजेचे
कोरोना व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी घरात थांबणे गरजेचे आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे.
– कैलास पटारे, सरपंच, डोंगरगण

कडक कारवाई गरजेची
लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवणार्‍यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात अद्यापही चौकाचौकात घोळक्याने गप्पा मारणे, विनाकारण दुचाकीवर चकरा मारणे हे प्रकार सुरु आहेत. ते बंद झाल्यावरच लॉकडाऊन खर्‍या अर्थाने यशस्वी होईल.
– बंडु पवार, उपसरपंच, जेऊर.

- Advertisment -

ताज्या बातम्या