कोरोना संकट काळात घराबाहेर पडू नये – ना. थोरात
Featured

कोरोना संकट काळात घराबाहेर पडू नये – ना. थोरात

Sarvmat Digital

संगमनेर (प्रतिनिधी) – कोरोना या आजाराने संपूर्ण जगासह महाराष्ट्रावर मोठे संकट आले असून याचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यामध्ये जनतेने संपूर्ण सहकार्य करणे गरजेचे असून कोरोनाच्या या संकट काळात नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

कोरोनाबाबत जनतेला आवाहन करताना महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोना या आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. हे जगासह देश व महाराष्ट्रावरील मोठे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अत्यंत गरजेचे असून यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. राज्य सरकारचे सर्व विभाग कोरोना रोखण्यासाठी अत्यंत चांगले काम करत आहेत. यामध्ये राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांचे संपूर्ण सहकार्य अपेक्षित आहे.

मात्र अद्याप अनेकजण याकडे गांभीर्याने पाहत नाहीत हे चिंताजनक आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी तसेच घराबाहेर पडणे टाळावे. याच बरोबर आपल्या कुटुंबियांची व समाजाची काळजी घ्यावी. कोरोना हटवण्यासाठी व जनतेच्या सुरक्षिततेसाठीच राज्य सरकारने महाराष्ट्रात 144 कलम लावले असून आपण सर्वजण मिळून सरकारला पूर्ण सहकार्य देत संघटितपणे कोरोनाचा मुकाबला करू या.

कोरोना हा एक संसर्गजन्य विषाणू आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावेत तसेच तोंड नाक व डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नये. ग्रामीण भागात होणारे विवाह सोहळे शक्य झाल्यास तुर्तास स्थगित करावे. किंवा अगदी साध्या पध्दतीने मर्यादीत लोकांमध्येच करावेत. परकीय व्यक्तींच्या संपर्कात राहू नये शिंकताना व खोकताना तोंडाला रुमाल लावावा. तसेच ज्यांना खोकला, सर्दी किंवा तापाचा त्रास जाणवतो आहे.

त्यांनी संबंधित जवळच्या दवाखान्यात डॉक्टरांकडे तपासून घ्या. सर्वांनी गर्दीत जाणे टाळावे त्याचप्रमाणे स्वत:ची काळजी घेत घराबाहेर न पडता कोरोनाच्या लढाईत नागरिकांनी सरकारला संपूर्ण साथ द्यावी असे आवाहनही महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com