करोना विषाणूमुळे धुमधडाक्यातील लग्न सोहळ्यांना ब्रेक !
Featured

करोना विषाणूमुळे धुमधडाक्यातील लग्न सोहळ्यांना ब्रेक !

Sarvmat Digital

वर-वधू हिरमुसले तर मंगल कार्यालय, केटरिंगवाल्यांचे कंबरडे मोडले

अहमदनगर (प्रतिनिधी)- वधूला वर आवडला, अन् लग्नाची बोलणीही झाली आणि मुहूर्तही ठरला. मात्र, लग्नाची जय्यत तयारी सुरू असतानाच करोना विषाणू आडवा आला. त्याने धुमधडाक्यातील लग्न सोहळ्याचा पचका केला. तिच्या आणि त्याच्या मनी रंगलेलं लग्न सोहळ्याचे स्वप्न करोनाच्या संकटाने पुरते भंगले. त्या दोघांच्या स्वप्नभंगाबरोबरच मंगल कार्यालय, केटरिंगवाल्यांचे बजेट कोलमडल्याने कंबरडे मोडले. आता ते दोघं मोजक्याच वर्‍हाडींच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकण्यास तयार झाले, पण येथेही आडवा आला लॉकडाऊनचा नियम, त्यामुळे लग्नाळूंचा हिरेमोड झाला असून त्यांच्या हास्यासाठी आता मंगल कार्यालय असोशिएशनने पुढाकार घेत कलेक्टरांना पत्र दिले आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वाूमीवर 24 मार्चपासून देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. विवाहांनाही बंदी घातली गेलीय. एप्रिल-मे महिन्यातील नियोजीत लग्न सोहळे स्थगित झाले. ब्रम्हगाठीचा मुहूर्त करोनारुपी राक्षसामुळे हुकला अन् लग्नाळू हिरमुसले. वर्षाच्या लग्नसराईवर गंडांतर कोसळले. लग्नसराईच्या हंगामावर पूर्णत: अवलंबून असणारे आचारी, केटरर्स, घोडेवाले, गाडीवाले, वाजंत्रीवाले, ब्युटी पार्लर, ब्राम्हण, फोटोग्राफर्स या लघू व्यावसायिकांबरोबरच किराणा दुकानदार आणि सोने-चांदी खरेदीचे व्यवहारही ठप्प झाले. सगळ्यात जास्त नुकसानीचा फटका लॉन्स, सांस्कृतिक कार्यालय या गोंडस नावाने लाखोंची कमाई करणार्‍या मंगलकार्यालय चालकांना बसला. करोनारुपी राक्षसाने देशात नव्हे तर जगात धुमाकूळ घातल्याने सर्वच व्यवसायांवर पाणी फिरले आहे.

लग्न ठरले, पण मुहूर्त हुकले
19 मार्चपर्यंत काही विवाह पार पडले. आता पावणेदोन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात लग्नाळूंचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रमही थांबला आहे. एप्रिल-मे महिन्यात अनेकांचे विवाह ठरले पण मुहूर्त हुकले. 14,15,16,26, 27,28 हे एप्रिलमधील तर 1,2,5,6,8 या हे मे महिन्यातील लग्नाच्या तिथी होत्या. पण लॉकडाऊनमुळे त्या वाया गेल्या.

मंगल कार्यालयवाले प्रशासनाच्या दारात….
केंद्र शासनाने 50 वर्‍हाडींच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिल्याचे समजले. जिल्हा प्रशासनाने मात्र कोणत्याच मार्गदर्शक सूचना केलेल्या नाहीत. अनेक वर-वधू पिता हे वरात, गर्दी टाळून मोजक्याच वर्‍हाडींच्या उपस्थितीत फक्त धार्मिक विधी करण्यास तयार आहेत. त्यासाठी ते मंगल कार्यालयाकडे विचारणा करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याच सूचना नाहीत. याशिवाय मुहूर्त संपल्याने मंगल कार्यालयाचे लोकल टॅक्स भरणेही कठीण झाले आहे. आता उरलेले मुहूर्त हाती लागावे यासाठी प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

जूनमध्ये अवघे सहा मुहूर्त
जूनमध्ये 11,14,15,25,29 व 30 या तिथी विवाह मुहूर्त पंचांगामध्ये शुभ म्हणून नोंदल्या गेल्या आहेत. जुलै महिन्यात चातुर्मास प्रारंभ होत असल्याने विवाह मुहूर्त वर्जित आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण मार्च आणि मे महिना अर्धा तर एप्रिल पूर्ण लॉकडाऊनमध्ये गेल्याने वधू आणि वरबापही चिंताग्रस्त आहेत. लॉनडाऊनमध्ये असल्याने विवाह जुळणीच झाली नसल्याने मे अन् जून महिनासुध्दा विवाह होण्यास अडचणीचा झालेला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com