कोरोनाच्या संकटात किराणा दुकानदारांची चांदी

कोरोनाच्या संकटात किराणा दुकानदारांची चांदी

किराणा मालाची सर्रास चढ्या भावाने विक्री; ग्राहकांची लूट

टाकळीभान (वार्ताहर) – देशावर कोरोनाचे महासंकट आल्याने सरकारी यंत्रणा हे संकट दूर करण्यासाठी जिवाची पर्वा न करता संकटाशी दोन हात करीत आहे. याउलट ग्रामिण भागातील किराणा व्यापारी या संकटाला संधी समजून किराणा माला अव्वाच्या सव्वा भागात विक्री करुन चांदी करीत आहेत. कोरोनाच्या संकटाने भेदरलेल्या नागरिकांची संकटातही लुट करीत असल्याने मुडद्याच्या टाळुवरील लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याचे जागरुक नागरीक बोलत आहेत.

सध्या देशावर कोरोनाचे महासंकट घोंगावत आहे. या महासंकटाशी दोन हात करण्यासाठी सरकार खंबीरपणे रस्त्यावर उतरले आहे. गेल्या 19 मार्च पासून राज्य सरकारने राज्य तर 24 मार्च पासून केंद्र सरकारने देश लॉकडाऊन करुन देशभर संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे नागरीक घरात बसूनच कोरोनाला परतवून लावण्यासाठी गनिमी काव्याची लढाई करीत आहेत.

कोरोनापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी महसुल व पोलीस प्रशासन रात्रंंदिवस रस्त्यावर उतरुन गर्दी पांगवण्यासाठी जीव धोक्यात घालून नागरिकांचे रक्षण करीत आहेत तर डॉ. व आरोग्य कर्मचारी जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करीत आहेत. अनेक दानशुर या संकटात आर्थिक मदत करीत आहेत. सर्वच क्षेत्रातील मान्यवर नागरिकांना आधार देत मदतीला धाऊन येत आहेत.

या संकटाशी दोन हात करण्यासाठी शासकीय यंत्रणा जिवाचे रान करीत असले तरी टाकळीभान परिसरातील किराणा व्यवसायिक या संकटाला संधी समजून उखळ पांढरे करुन घेत आहेत. सामान्य नागरिकांची लुट करीत आहेत. दाळी, साखर, शेंगादाने, गायछाप, खाद्यतेल व इतर साहित्य अव्वाच्या सव्वा भावात विक्री करुन जास्तीचा नफा कमावत आहेत.

शेंगदाणे 150 रुपये किलो पर्यंत पोहचले आहेत तर खाद्यतेलाच्या पंधरा किलोच्या डब्याचा भावही 150 ते 200 रुपयाने वाढला आहे. दाळींचा भावही 20 ते 30 रुपयाने वाढविण्यात आला आहे. गायछाप पुडीचा भाव तर थेट दुप्पट झाला आहे. सर्वच किराणा मालाचे भाव वाढल्याने छटाक-आतपाव घेणार्‍या गरिबांची तर मोठी लुट सुरु आहे.

दर वाढीबाबत नागरिकांनी विचारणा केली असता शॉर्टेज आहे, कसातरी माल आणला, घ्यायचा असेल तर घ्या. अशी भाषा वापरुन ग्राहकाला निरुत्तर करण्याचेही प्रकार घडत आहे. भावाबाबत घासाघिस करणार्‍या ग्राहकांना तर मागितलेला मालच शिल्लक नसल्याचे सांगून बोळवण केली जाते. छोट्या ग्राहकांना तर मालाचे बिलही दिले जात नाही. त्यामुळे किराणा माल विक्रेत्यांकडून ग्राहकांना तोंड दाबून बुक्याचा मार सुरु आहे.

शासकीय यंत्रणेने रास्त भावात किराणा माल विकण्याचे आवाहन अनेकदा केलेले आहे. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत देशावरील संकटाला संधी समजून स्वतःची चांदी करण्याचा सपाटा या परिसरातील व्यवसायिकांनी सुरुच ठेवला आहे. तरी प्रशासनाने या प्रकाराला आळा घालून नागरिकांची लुट थांबवावी, अशी मागणी होत आहे.

तोंड पाहून मुजरा
येथील किराणा व्यावसायिक चढ्या भावाने मालाची विक्री करीत असले तरी ठराविक बोटावर मोजण्या इतक्या ग्राहकांना रास्त भावात मालाची विक्री केली जाते. त्यांना कच्चे बिलही दिले जाते. सामान्य नागरिकांना मात्र वाढीव भावाने मालाची विक्री केली जाते. भावावरुन झंजट घालणार्‍या ग्राहकांची मात्र शिल्लक नाही असे सांगून बोळवण केली जाते तर त्या बोटावर मोजण्या इतक्या ग्राहकांना आडबाजुला ठेवलेला सर्व माल काढून दिला जात आहे. बहुसंख्येने असलेल्या ग्राहकांची लुट तर तोंड पाहून मुजरा केला जात असल्याचा प्रकार सध्या सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com