‘करोना’च्या दृष्टचक्रात अडकले ग्रामसेवक !

‘करोना’च्या दृष्टचक्रात अडकले ग्रामसेवक !

एकीकडे शहरातून येणार्‍या लोेंढ्यामुळे परेशान, तर दुसरीकडे गावगुंडीने हैराण

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊनमध्ये सरकारने अनेक जिल्ह्यातून स्थलांतरितांना मूळगावी जाण्याची परवानगी दिली आहे. यामुळे शहरी भागातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. करोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या शहरातून गावांमध्ये मोठे लोंढे येवू लागल्याने गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना ग्रामसेवकांची दमछाक होत आहे.

गावात आलेल्यांची नोंदणी करण्यापासून संशयितांचे विलीगीकरण करण्यापर्यंतची अनेक कामे ग्रामसेवकांना करावी लागत आहेत. त्यात अनेकजण स्वत:च्या घरातच विलीगीकरण करण्याचा हट्ट धरतात. अनेकदा गावातील गावगुंडीच्या वादातून दबाव टाकण्याचेही प्रकार घडत आहेत. याशिवाय पंचायत समितीला दैनंदिन अहवाल पाठवणे, गरजूंना अन्नधान्याची मदत, परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था करणे अशा कामांचा ताण वाढत आहे.

या परिस्थितीचा विचार करता ग्रामसेवकांचे काम करताना मानसिक खच्चीकरण होतांना दिसत आहे. राज्यात करोनाचे संकट दाखल झाल्यापासून गावागावांत ग्रामसेवक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शासनाच्या सूचनेनुुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहेत. गावात नियमितपणे औषध फवारणी, निर्जंतुकीकरण करणे, येणार्‍या- जाणार्‍यांच्या नोंदी ठेवणे, राज्य, जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी येणार्‍या आदेशांची अंमलबजावणी करणे, आरोग्य विभागाच्या साथीने आजारी व्यक्तींपर्यंत पोहचून तपासणी करणे, आवश्यकता भासल्यास विलीगीकरण करणे यासह ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज करणे अशी कामे राज्यातील जवळपास 22 हजार ग्रामसेवक विनातक्रार करीत आहेत.

त्यात आता मोठ्या शहरांतून ग्रामीण भागात स्थलांतरित होणार्‍यांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढले आहे. या सर्वांची गावाच्या सीमावरच नोंदणी करणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे, त्यांच्या विलीगीकरणाची व्यवस्था करणे अशा कामांचा बोजा वाढला आहे. आतापर्यंत शांत असलेल्या ग्रामीण भागात या लोंढ्यांमुळे ताण वाढलेला आहे.

विशेषत: परगावहून गावात आलेल्यांच्या बाबतीत ठोस धोरण राबविताना ग्रामसेवकांना गावागावांत असलेले राजकारण, गटतट याचाही सामना करावा लागत आहे. याचा थेट परिणाम ग्रामसेवकांच्या शारीरीक व मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. अनेक ग्रामसेवक धास्तावले आहेत. कर्तव्य बजावताना कितीही काळजी घेतली तरी दररोज अनेकांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे मनात करोना संसर्गाची कायम भिती असते. या भितीपोटी घरी जावे की नाही, असाही प्रश्न निर्माण होतो. वास्तविक पाहता गावामध्ये एवढी मोठी अवाढव्य यंत्रणा राबवणे एकट्या दुकट्या ग्रामसेवकावर अन्याय करणारेच आहे. गावात ज्या ज्या समित्या स्थापन केल्यात त्याची सगळी जबाबदारी एकट्या ग्रामसेवकावर आहे.

गावगाडा चालू राहील हे पाहताना गावाचे आरोग्य राखण्याची जबाबदारी ग्रामसेवकाच्या खांद्यावर आहे. हे ओझे जुलुमाचे ठरत आहे. राज्य सरकारने व प्रशासनाने यासर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन गावपातळीवर ग्रामसेवकांना काम करताना चांगले वातावरण राहिल याची दक्षता घेतली पाहिजे, अशी मागणी ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com