वडाळ्याच्या ‘त्या’ रुग्णाने माहिती लपविल्याने करोनाचे निदान उशिरा !
Featured

वडाळ्याच्या ‘त्या’ रुग्णाने माहिती लपविल्याने करोनाचे निदान उशिरा !

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –  तालुक्यातील वडाळा येथील एका आश्रमात आलेल्या व्यक्तीने आपण प्रवास केल्याची माहिती डॉक्टरांपासून लपविल्याने सदर व्यक्तीस करोना आहे हे समजण्यासाठी उशीर झाल्याचे आता पुढे आले आहे. त्यामुळे गेले चार दिवस ‘त्या’ व्यक्तीच्या संपर्कात कोण कोण आले हे तपासण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे.

वडाळा येथील नेवासा रोडवरील एका अध्यात्मिक आश्रमातील एक 30 वर्षीय गृहस्थ श्रीरामपूरमधील एका खाजगी डॉक्टरकडे ताप आला म्हणून तपासणीसाठी आले. त्याठिकाणी काही तास सदर व्यक्तीवर उपचार झाल्यानंतर या खाजगी डॉक्टरांना या व्यक्तीबाबत संशय आल्याने त्यांनी श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात सदर रुग्णास पाठविले. त्याठिकाणी सदर रुग्णाने आपण वडाळ्याचे असल्याचे सांगितले. यावेळी सदर व्यक्तीने आपण औरंगाबादहून आल्याचे डॉक्टरांना सांगितले नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाने सदर व्यक्तीला नगर येथे तपासणीसाठी पाठवताना सोबत जो फॉर्म भरून पाठवायचा, त्यात सदर व्यक्तीने प्रवास केला नसल्याचे म्हटले.

शिवाय सर्दी-खोकला ही सदर व्यक्तीला नाही, केवळ ताप आल्याचे नमूद करत, सदर व्यक्तीचे स्राव घेण्यासाठी त्यास नगरला पाठवले. कागदावरील माहिती वाचून नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सदर व्यक्तीला स्राव घेण्याची गरज नाही, असे सांगितले. त्यामुळे ही व्यक्ती श्रीगोंदा येथील एका ओळखीच्या डॉक्टरकडे दि. 21 रोजी नगर येथून गेली. एक दिवस तेथे उपचार झाल्यावर सदर डॉक्टरांनीच दुसर्‍या दिवशी या व्यक्तीला पुन्हा नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला आणले. तेव्हा या व्यक्तीचा स्रावाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. आणि त्याचा रिपोर्ट काल आल्यानंतर सदर व्यक्तीस करोना असल्याचे स्पष्ट झाले.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळ्याच्या या व्यक्तीला करोना असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंतराव जमदाडे यांनी सदर व्यक्तीला फोन लावून त्याला करोनाची लागण कशी झाली असावी, यासाठी माहिती विचारली. त्यावेळी या व्यक्तीने सांगितले की, मी औरंगाबादहून वडाळ्याला आलो होतो. तेव्हा डॉक्टरांना सदर व्यक्ती हॉटस्पॉट असलेल्या औरंगाबादहून आल्याचे समजले.

सदर व्यक्तीने पहिल्याच दिवशी औरंगाबादहून आपण आल्याचे सांगितले असते तर त्या व्यक्तीच्या रिपोर्टमध्ये ही प्रवासाची हिस्ट्री नमूद करण्यात आली असती. आणि त्यामुळे सदर व्यक्तीचा स्राव त्याच दिवशी घेतला गेला असता. परिणामी चार दिवस सदर व्यक्ती इतर कोणाच्याही संपर्कात येऊ शकली नसती, असे डॉ. जमदाडे यांनी सांगितले. त्यामुळे आता सदर व्यक्तीच्या कोण कोण संपर्कात आले याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

केवळ ताप असलेल्या रुग्णालाही निघाला करोना
एखाद्या व्यक्तीला करोनाचा संशयित म्हणून जेव्हा डॉक्टर नगरला टेस्टिंगसाठी पाठवतात, तेव्हा फॉर्म भरायचा असतो. त्यावर सदर इसमाने प्रवास केलेला आहे का? त्याला ताप आहे का? खोकला येतो का? घसा दुखतो का? सर्दी आहे का? अशा अनेक बाबी तपासून त्याची नोंद या अर्जावर तपासणारे डॉक्टर करत असतात. वडाळ्याच्या या करोनाग्रस्ताला ताप सोडून इतर कोणतेही लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे तसा फॉर्म भरून तेथील डॉक्टरांनी त्याला नगरला पाठविले. फॉर्मवर असलेल्या नोंदी पाहून नगरलाही या गृहस्थाला करोना नसावा असे समजून त्याची 21 तारखेला तपासणी केली गेली नाही, असे समजते. या घटनेनेमुळे एखाद्याला नुसता ताप असला तरी त्याला करोना असू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com