कोरोना : नगरमधील 22 जण ठणठणीत
Featured

कोरोना : नगरमधील 22 जण ठणठणीत

Sarvmat Digital

आणखी पाच नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी सोमवारी 8 आणि मंगळवारी 14 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व नमुने कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. यातील आठ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर अन्य चौदा जणांना आज सोडले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवारी आणखी 5 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. तसेच, 5 व्यक्तींना जिल्हा रुग्णालय येथे तर 2 व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत असल्याबद्दलही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आभार मानले आणि नागरिकांनी हे संकट दूर करण्यासाठी आणखी काही दिवस सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन केले.

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात पुण्याहून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी म्हणाले, जे सध्या 14 जणांचे नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ते निगेटीव आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरु झाली आहे. परदेशातून परत आलेल्या नागरिकांनी स्वतःहून त्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, ज्या नागरिकांना घरीच वेगळे देररेखीखाली ठेवले जाणार आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी स्वताच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, तसेच इतर नागरिकांच्या संपर्कात येऊन प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसे न केल्यास संबंधित नागरिकांना जिल्हा रुग्णालयाच्या देखरेखीखाली ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्याठिकाणी या व्यक्तींना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, त्याठिकाणी जिल्हा प्रशसना आणि आरोग्य विभागाच्या यावतीने आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, असे ते म्हणाले. यापूर्वीच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र तसेच ग्रामीण क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, आयटीआय, तंत्र प्रशाला, निवासी वसतीगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, कोणतेही खासगी क्लासेसही या काळात सुरु राहणार नाहीत. तसे करणार्‍यावर कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या काळात शहर व जिल्ह्यातील दुकानेही अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी बंद ठेवण्याची सूचना त्यांनी केली.

घरात निरीक्षणाखाली असणार्‍या संशयित नागरिकांच्या हाताच्या पंजावर पाठीमागून ठसे मारण्यात आले आहेत. जेणेकरून हे नागरिक घराच्या बाहेर पडणार नाहीत. तसेच आपण आजारी आहोत हे त्यांच्या सतत लक्षात राहावे, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com