Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरआणखी चौघांची करोनावर मात !

आणखी चौघांची करोनावर मात !

करोना निगेटिव्हची संख्या 40 : आता अवघ्या 10 रुग्णांवर उपचार सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी जामखेड येथील चौघे रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या काल बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 40 झाली आहे. जिल्ह्यात करोना बाधित व्यक्तींची संख्या 53 असून त्यापैकी आता 10 जणांवर उपचार सुरू असून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

- Advertisement -

जामखेड येथील या रुग्णांचे 14 दिवसांनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना काल डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी बूथ हॉस्पिटलचा डॉक्टर्स, नर्सेस यांनी रुग्णाला निरोप देऊन आरोग्य चांगले राखण्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या रुग्णानेही त्याच्यावर चांगले उपचार आणि योग्य काळजी घेतल्याबद्दल सर्व डॉक्टर्स नर्सेस आणि इतर स्टाफचे आभार मानले. काल नेवासा येथील रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता.

आतापर्यंत 1 हजार 750 व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 658 स्त्राव निगेटिव्ह आले तर 53 व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले.आता 40 व्यक्ती बर्‍या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या 9 रुग्ण बूथ हॉस्पिटलमध्ये तर 1 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. यात पाथर्डी येथील 1, जामखेड येथील 1, संगमनेर येथील 1 आणि धांदरफळ येथील 7 रुग्णांचा समावेश आहे. कोपरगाव, जामखेड आणि धांदरफळ येथील तिघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जामखेडच्या बाधीताचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले 25 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांचे अहवाल काल सकाळी प्राप्त झाले. यात, जामखेड येथील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा 14 दिवसानंतरचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने त्याला आणखी 7 दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. उर्वरित सर्व अहवाल निगेटीव्ह आले असून यात संगमनेर 3, धांदरफळ 2, नगर 1, श्रीरामपूर 1, जामखेड 4 आदींचा समावेश आहे. अद्याप 7 अहवालांची प्रतीक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या