कोरोनाबाधितांच्या परिसरावर आरोग्य विभागाचा ‘वॉच’
Featured

कोरोनाबाधितांच्या परिसरावर आरोग्य विभागाचा ‘वॉच’

Sarvmat Digital

तीन किलोमीटर परिसरातील 14 हजार कुटुंबांची दैनंदिन आरोग्य तपासणी

अहमदनगर/ नेवासा (प्रतिनिधी)- कोरोना बाधित अहवाल आलेल्या नेवासा तालुक्यातील ‘त्या’ व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क आणि लो रिस्क व्यक्तींसोबत घरापासून तीन किलो मीटर परिसरातील कुटुंबांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. यात या भागातील कुटुंबांना श्वसनाचा त्रास होतो की नाही, याची माहिती घेण्यात येत आहे. आगामी काही दिवस ही दैनंदिन तपासणी सुरू राहणार असल्याचे स्थानिक यंत्रणेकडून सांगण्यात आले.

नेवासा तालुक्यातील एका व्यक्तीला कोरोना संसर्ग असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याला नगरमधील बूथ हॉस्पिटलमधील विलिगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. पुढील उपचारासह आरोग्य विभाग करडी नजर ठेवून आहे. मात्र, त्यावर न थांबता आरोग्य विभागाने संबंधित व्यक्तीच्या अतिसंपर्कातील हाय रिस्क असणार्‍या 46 रुग्णांची तपासणी केली आहे. यात सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांंना घरी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यासह काही व्यक्ती ‘या’ रुग्णाच्या संपर्कात आल्या. मात्र ते लो रिस्क असल्याने त्यांना 14 दिवसांसाठी घरात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर देखील आरोग्य विभागाची नजर आहे.

दरम्यान, बाधीत व्यक्तीच्या घराच्या तीन किलोमीटर परिसरातील कुटूंबांचे दैनंदिन सर्वेेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे. यात शुक्रवारी नेवासा शहरातील विविध भाग, फाटा, वस्त्या, कॉलनी, नगर आणि काही गावे अशा 32 ठिकाणच्या 2 हजार 853 घरातील 13 हजार 781 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात त्यांना श्वसनाचा विकार आहे का, याची खातर जमा करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात 154 व्यक्तींना श्वसनासंदर्भात त्रास आढळून आला असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तसेच घराच्या बाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. पुढील काही दिवस याच भागात ही दैनंदिन आरोग्य सेव्हेक्षण सुरू राहणार असून तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांचे या सर्वेक्षणावर लक्ष राहणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com