नगरमधील वृध्देला करोना

jalgaon-digital
3 Min Read

महिनाभरानंतर पुन्हा करोनाचा शिरकाव

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिनाभरात एकही पॉझिटिव्ह न आढळल्याने नगर शहरातून करोनावर मात केल्याचा सर्वांचा भ्रम झाला होता. मात्र, मंगळवारी सकाळी शहरातील एका 70 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आणि पुन्हा एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे दम्याचा आजार असणारी ही महिला गेल्या कित्येक महिन्यांपासून घरात पडून होती. यामुळे या महिलेला कोणामुळे करोनाची बाधा झाली याचा शोध प्रशासनाकडून सुरू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील करोना बाधीतांचा आकडा आता 54 वर पोहचला असून 40 रुग्णांनी करोनावर मात केली असून 11 रुग्णांवर नगरमध्ये उपचार सुरू आहेत.

12 मार्चला शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर जिल्हा प्रशासन सर्तक झाले. पुढे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू झाले. महापालिकेच्या आरोग्य विाागाने होम टू होम चेकिंग सुरू केले. 6 एप्रिल रोजी सर्जेपुरात सापडलेल्या पेशंटनंतर एकही पॉझिटिव्ह रिपोर्ट आला नाही. जिल्हाभरात नव्याने पेशंट न सापडता असलेले बाधित निगेटिव्ह होऊन घरी परतले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या आठवर पोहचली असताना संगमनेरात करोनाने षटकार ठोकला. त्यामुळे ऑरेंजकडून ग्रीनकडे वाटचाल सुरू असलेल्या नगर जिल्ह्याला पुन्हा रेड सिग्नल मिळतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर जामखेडचे चौघे ठणठणीत होऊन घरी परतले अन् पुन्हा काहीसा दिलासा मिळाला.

54 संशयित ताब्यात अन् परिसर सील
जिल्हा प्रशासनाने करोना बाधित महिला राहत असलेला संपूर्ण परिसर सील केला आहे. या भागातील 54 व्यक्तींना ताब्यात घेवून तपासासाठी जिल्हा रुग्णालयात बोलविण्यात आले होते. या महिलेला कोरोना लागण कशी झाली याचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे. तसेच त्या महिलेच्या संपर्कात आणखी कोण कोण आले याची माहिती संकलीत केली जात आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील , तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुलानी , बांधकाम विभाग प्रमुख सुरेश इथापे, अभियंता निंबाळकर यांच्यासह महापालिकेच्या अनेक अधिकार्‍यांनी परिसराची पहाणी करत तो सील केला. या भागांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद करत तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

17 हायरिस्कचे नमुने घेतले
सुभेदार गल्ली आणि बाधीत महिलेच्या कुटूंबातील 17 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. या भागातून 54 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात बोलविण्यात आले होते. मात्र, यातील हायरिस्क असणार्‍या 17 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहेत. उर्वरित व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असून आधीचे 11 अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

बाधीतांचे कुटुंबीय दुचाकीवरून सिव्हिलमध्ये
सुभेदार गल्लीमधील वृध्द करोना बाधीत सापडल्यानंतर त्या ठिकाणी पोलीसांनी बाधीतांच्या कुटूंबियांना जिल्हा रुग्णालयात जावून करोना चाचणी करण्यास सांगितले. त्यावर रुग्णवाहिका येवून आपल्याला जिल्हा रुग्णालयात सोडतील, असे बाधीतांच्या कुटूंबियांना वाट होते. प्रत्यक्षा रुग्णवाहिका न आल्याने अखेर बाधीत कुटूंबातील व्यक्ती स्वत:च्या दुचाकीवर दोन ते फेर्‍या मारून कुटूंबियांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावरून महापालिका आरोग्य विभागाचा कारभार समोर असल्याचे सुत्रांनी सांगितले. तसेच हाय रिस्करांबाबत प्रशासन किती काळजी घेते, हे समोर आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *