Friday, April 26, 2024
Homeनगरकोरोना : नगर, संगमनेरात हाय अलर्ट

कोरोना : नगर, संगमनेरात हाय अलर्ट

  • जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल 9 जण पॉझिटिव्ह, संगमनेरातील चौघे
  • परप्रांतिय, पण मुकुंदनगरला राहणार्‍या दोघांना कोरोना
  • जिल्ह्यात बाधितांची संख्या 17 वर
  • दोन परदेशी नागरिकांसह जामखेडमधील महिलेचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात गुरुवारी आणखी नऊजण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आता कोरोना बाधितांची संख्या 17 झाला आहे. गुरूवारी कोरोना बाधित आढळलेल्या नऊजणांमध्ये संगमनेर तालुक्यातील चौघे, दोन परदेशी व्यक्ती, मूळचे कोटा (राजस्थान) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) येथील दोघे भाषांतरकार आणि जामखेड तालुक्यातील महिलेचा समावेश आहे. यामुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आजपासून जिल्हा प्रशासन लॉकडाऊन सक्ती अधिक कडक करणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी आता तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आहे, मात्र, नागरिकांनी आता नियमांचे पालन करावे आणि घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे बुधवारी सकाळपर्यंत 112 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 51 स्त्राव चाचणी अहवाल गुरुवारी दुपारी प्राप्त झाले होते. त्यात सहाजण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील दोन परदेशी व्यक्तीपैकी एक इंडोनेशिया येथील तर दुसरा जिबुटी येथील आहे.

या व्यक्तींनी नवीदिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर ते संगमनेर आणि मुकुंदनगर येथील व्यक्तींच्या संपर्कात आले होते. त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रात्री 9 च्या सुमारास पुन्हा शिल्लक असणार्‍या अहवालापैकी 60 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. यात तिघे कोरोना बाधीत असल्याचे समोर आले. बाधीतांमध्ये संगमेनर तालुक्यातील दोघांचा समावेश असून जामखेड तालुक्यातील स्थानिक पहिल्या बाधीताच्या पत्नीचा समावेश आहे.

पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवरील सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या असून संगमनेर आणि मुकुंदनगर परिसरात प्रतिबंधात्मक आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हे नागरिक राहात असलेला परिसरातील नागरिकांची बाहेर अनावश्यक ये-जा प्रतिबंधित करण्यात यावी. या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन यावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जीवनावश्यक वस्तू, सेवा आणि पुरवठा नियमितपणे होत आहे. तरीही, अनावश्यकपणे नागरिक घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा. स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या चांगल्या आरोग्यासाठी घरातच राहा. सुरक्षित राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संगमनेरचे जामखेड कनेक्शन
संगमनेरमधील दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे गुरूवारी समोर आले. यातील बाधीत व्यक्त या नगरहून जामखेडला गेल्या त्या परदेशी नागरिकांच्या भेटीला गेले होते. यातून संगमनेरच्या स्थानिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्य विभागाने बाधीत संगमनेरमधील बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेले त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीची तपासणी करून नमुने तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह संगमनेर शहरातील बाधीत व्यक्तींच्या घरापासून अर्धा किलो मीटरपर्यंत सलग 14 दिवस आरोग्य सर्वेक्षण करून कोणाला ताप, खोखला आणि सर्दीसह श्वसनाची तक्रार आहे का? याची खातर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेवाशाच्या बाधीताची दुसरी चाचणी
जिल्ह्यात बाधीत आढळलेल्या दुसर्‍या नेवासा येथील व्यक्तींचा 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला आहे. यामुळे त्याचा दुसरी चाचणी करण्यात आली असून स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. यासह आधीचा एक अहवाल आणि गुरूवारी घेण्यात आलेल्या स्त्राव याचा अहवाल आज प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.

संगमनेरमधील चौथा रुग्ण आश्वीचा
संगमनेर तालुक्यात चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरूवारी आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. यात तिघे रुग्ण हे संगमनेर शहरातील असून तिसरी व्यक्ती ही तालुक्यातील ग्रामीण भाग असणार्‍या संगमनेर तालुक्यातील आश्वी गावातील आहे. संबंधीत व्यक्ती नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधीताच्या संपर्कात आली असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या व्यक्तीच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या