करोनाच्या गडबडीत ‘खरीपा’ची तयारी सुरू
Featured

करोनाच्या गडबडीत ‘खरीपा’ची तयारी सुरू

Sarvmat Digital

बोगस बियाणे, काळाबाजार रोखण्यासाठी 15 भरारी पथके तयार

अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्र करोना संसर्गाची गडबड सुरू असतांना खरिपाचा हंगाम जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी, कृषी विभाग खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. यात हंगामासाठी आवश्यक खते, बियाणे यांचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच नेहमीप्रमाणे जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्रीवर लगाम घालण्यासाठी कृषी विभागाने 15 पथके केली आहेत.

जिल्हा कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खरिपाचे नियोजन करण्यात येत आहे. तोंडावर आलेल्या खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यात तालुकानिहाय एक अशी 15 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात एक पथक कार्यरत राहणार आहे. यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक टळेल व अनधिकृतरित्या विक्री होणार्‍या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

खरीप हंगाम सुरू झाल्यांनतर खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांची झुंबड उडत असते. अशावेळी शेतकर्‍यांची फसगत होण्याची अधिक शक्यता असते. यात सगळ्याच बियाण्यांचा समावेश असून प्रामुख्याने कापसाचे बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात बाजारात येते. या फसगतीमुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही शेतकरी फसवणूक झाल्याने टोकाचे पाऊलही उचलतात.

शेतकर्‍यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे किंवा खत पाकिटाचे सील, टॅग व लॉट क्रमांक शेतकर्‍यांनी तपासावे. सोबतच ते जपून ठेवावे. अनधिकृत बियाणे घेऊ नये असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. तसेच अनधिकृत बियाण्यांच्या व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी कृषी विभागाची पथके कार्यरत राहतील, असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com