Wednesday, April 24, 2024
Homeनगरऐन करोनाच्या काळात अनेक आरोग्य उपकेंद्र डॉक्टरांच्या प्रतिक्षेत

ऐन करोनाच्या काळात अनेक आरोग्य उपकेंद्र डॉक्टरांच्या प्रतिक्षेत

कोतूळ (वार्ताहर) – करोना महामारीने सर्वत्र जनता भयभीत आहे. रुग्ण व जनतेला आरोग्य विषयक मार्गदर्शन व उपचाराची खरी गरज आहे. करोनाचा आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. करोनाला आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. यात आरोग्य यंत्रणेचे हात कमी पडू लागले आहे मात्र शासकीय यंत्रणेचा हात लाल फितीत अडकल्याने जिल्ह्यातील सुमारे 445 उपकेंद्रावरील डॉक्टरांच्या नेमणूका रखडल्या आहे. ग्रामीण भागातील हे आरोग्य उपकेंद्र डॉकटरांच्या प्रतीक्षेत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान-आरोग्य वर्धिनी योजने अंतर्गत जिल्ह्यातील 445 आरोग्य उपकेंद्रना समुदाय आरोग्य अधिकारी याांच्या नेमणुका करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या यासाठीची मोठी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावर शासनाने मोठा निधीही खर्च केला मात्र अद्यापही या आरोग्य उपकेंद्रांना डॉक्टर मिळाले नाही. सध्या गावोगावी करोनाच्या भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणात आरोग्याची काळजी घेणारे अधिकारी नसेल तर ते आरोग्य केंद्र काय कामाचे ? असा सवाल सामान्य जनतेतून केला जात आहे.

- Advertisement -

आयुष्यमान भारत-आरोग्य वर्धिनी कार्यक्रमाअंतर्गत फेबुवारी 2020 मध्ये जाहिरात देऊन बीएएमएस व बीएस्सी नर्सिंग पात्रता धारकांकडून 445 जागा साठी अर्ज मागविले होते. त्यानुसार सरकारी कामाची सेवा करता यावी म्हणून खाजगी प्रॅक्टिस करणार्‍या अनेकांनी यासाठी अर्ज केले. आपले खाजगी दवाखाने बंद करून, या ठिकाणच्या परीक्षा दिल्या, परीक्षाही उत्तीर्ण झाले.

या परिक्षार्थीं डॉक्टरांनी लोणी, विळद, नगर, नाशिक या ठिकाणी सहा महिन्यांचे प्रशिक्षणही पूर्ण केले मात्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केवळ निकाल घोषित न केल्याने या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यातील 37 टक्के निकाल जाहीर केले त्यातील फक्त 164 जणांच्या नेमणूक केल्या मात्र उर्वरीत निकाल जाहीर न केल्याने या नियुक्त्या रखडल्या आहेत. प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी सर्व प्रशिक्षणार्थीकडून 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अटी शर्ती लिहून घेतल्या. नेमणुकी नंतर सलग 3 वर्ष सेवा द्यावी लागेल, दुसरीकडे सेवा करता येणार नाही.

नियुक्तीचे ठिकाणी हजर न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, खाजगी ओपीडी करता येणार नाही असे लेखी लिहून घेतले मात्र अद्याप ही नेमणुका न मिळाल्याने परीक्षार्थी मध्ये अस्वस्थता आहे. ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था त्यांची झाली आहे. स्वतःचा दवाखाना बंद करून नोकरीच्या मागे लागलेले अनेक डॉक्टर आता करोना महामारीत घरी हात बांधून बसले आहेत.

ग्रामीण भागात करोनामुळे आरोग्य यंत्रणा वर ताण पडला आहे. या जागांवरील नेमणूक झाल्यास ताण हलका होऊ शकतो. ग्रामीण भागात ग्राउंड लेव्हल वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत आरोग्य उपकेंद्र मार्फत सरकारी आरोग्य सेवा पुरवली जाते. साधारण 4000 ते 5000 लोकसंख्या गृहीत धरून एक आरोग्य उपकेंद्र असते. या उपकेंद्रा मार्फत सरकारी आरोग्य सेवा पुरविली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रणात एक आरोग्य सेविका एक आरोग्य सेवक उपकेंद्रात काम करतात. या दोन कर्मचार्‍यांबरोबर आता आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून स्वतंत्र डॉक्टर उपकेंद्रात रुग्णांच्या सेवेत राहणार आहे.

अकोले तालुक्यात 11 प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत सुमारे 59 आरोग्य उपकेंद्र आहे. सध्या करोना व्हायरसमुळे हे सर्व आरोग्य उपकेंद्र सतर्क आहेत. सुदैवाने तालुक्यात अद्याप करोनाचा एकही रुग्ण नाही तरी देखील आरोग्य यंत्रणा लक्ष ठेऊन चांगले काम करत आहे. अकोले तालुका आदिवासी व दुर्गम तालुका आहे. पुढील महिन्यात तालुक्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन होणार आहे. पुढील काळात पावसाळा लक्षात घेता प्रत्येक आरोग्य उपकेंद्रावर समुदाय आरोग्य अधिकार्‍याची आवश्यकता आहे. तात्काळ या नेमणुका होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

करोना नियंत्रणाला मदत
करोनासाठी वैद्यकीय कर्मचारी, अधिकरी संख्या कमी पडत आहे मात्र शासनाने समुदाय आरोग्य अधिकारी नेमणुकीसाठी नेमणूक प्रक्रियावर मोठा खर्च करूनही नेमणूका दिल्या नाही. या नेमणूका तात्काळ झाल्यास ग्राम पातळीवर शासनाच्या आरोग्य यंत्रणेला तात्काळ हे मनुष्यबळ उपलब्ध होणार होऊन करोनाला नियंत्रणात ठेवण्यात मदत होऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या