…तर 1 जूनपर्यंत जिल्हा करोनामुक्त; पालकमंत्री मुश्रीफ यांचा विश्वास
Featured

…तर 1 जूनपर्यंत जिल्हा करोनामुक्त; पालकमंत्री मुश्रीफ यांचा विश्वास

Sarvmat Digital

अहमदनगर – जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घेतली तर आपण या संकटावर निश्चितपणे मात करु. आगामी काळात करोना संसर्गाचे रुग्ण सापडले नाहीत, तर जिल्हा १ जून रोजी करोनामुक्त होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाटी करावयाच्या विविध उपाययोजनांचा तसेच इतर योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ना. मुश्रीफ म्हणाले, सध्या आपल्याकडे करोना वाधित ६८ रुग्ण आहेत. त्यापैकी ४९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात १२ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला होता. मे महिन्यात बाहेरुन येणार्‍या नागरिक बाधित आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. नागरिकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना परत त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगला पाठपुरावा केल्यामुळे आतापर्यंत ३० हजार नागरिकांपैकी २३ हजारांपेक्षा अधिक मजूर, कामगार, भाविक, विद्यार्थी त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत १० विशेष श्रमिक रेल्वेमार्फत त्यांना रवाना करण्यात आले आहे. आणखी ०६ रेल्वेद्वारे उर्वरित नागरिकांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात येणार आहे. याशिवाय, परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून १६ हजार नागरिक आपल्या जिल्ह्यात परत आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com