‘कोरोना’ ला रोखण्यासाठी नगरकर सरसावले
Featured

‘कोरोना’ ला रोखण्यासाठी नगरकर सरसावले

Sarvmat Digital

15 दिवस शासकीय कार्यक्रम रद्द; खासगी उत्सव, वाढदिवस, लग्न समारंभास गर्दी न करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाचे संकट उंबरठ्यापर्यंत आले आहे, मात्र त्याला आत येऊ न देण्यासाठी नगरकर एकवटले आहेत. प्रशासन, डॉक्टर, सामाजिक संस्था आणि नागरिक आपापल्या परीने खबरदारी घेत असून जनजागृतीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 15 दिवस शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मोठ्या यात्रा, उत्सव या ठिकाणी दक्षता घेण्याचे आदेश जिल्हधिकार्‍यांनी दिले आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार बैठका घेऊन दक्षता घेण्याच्या सूचना देत आहेत.

कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रम, मेळावे येत्या 15 दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत. तसेच नगरमध्ये या काळात होणारे खासगी उत्सव, सण, वाढदिवसांच्या पार्ट्या, लग्न समारंभ या ठिकाणी शक्यतो गर्दी करू नये, नागरिकांनी कोरोनासंदर्भात दक्षता घ्यावी, मोठ्या यात्रा उत्सव या ठिकाणी देखील दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, कोरोना व्हायरसचे आव्हान आहे. जिल्ह्यात गुरूवारपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वप्रथम शासकीय पातळीवर जिल्ह्यामध्ये होणारे सर्व कार्यक्रम पंधरा दिवसांसाठी रद्द केले आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या यात्रा, उत्सव आणि लग्न समारंभ सुरू आहे. या समारंभात जनतेने गर्दी करणे टाळले पाहिजे. जनतेचे नियमांचे पालन केले पाहिजे. सूचना देऊनही काही ठिकाणी कार्यक्रम होणार असतील तर तेथे प्रसंगी प्रशासकीय पातळीवर निश्चितपणे कर्यावाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. बंदी घालण्यापेक्षा एखादा कार्यक्रम रद्द करण्याची नागरिकांनी स्वतःहून विचार केला पाहिजे, असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यातील मढी यात्रेच्या संदर्भामध्ये संबंधित ट्रस्टी यांच्याशी बोलणे झालेले आहे. मुळातच मढी येथे भाविकांची संख्या कमी झालेली आहे. मात्र, या ठिकाणीसुद्धा विशेष दखल घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आज होणार ग्रंथोत्सव रद्द

आज होणारा शासकीय ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यासह येत्या 15 दिवसांत होणार्‍या शासकीय कार्यक्रम, मेळावे, बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी स्व शिस्त पाळावी, ती जर पाळली गेली नाही तर प्रशासन कारवाई करले, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला.

मॉल, चित्रपटगृह चालकांना सुचना
जिल्ह्यात असणार्‍या मॉल, चित्रपटगृह या ठिकाणी असणार्‍या रिलींग, खुर्ची या ठिकाणी कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छता आणि अन्य आवश्यक उपाययोजन करण्याच्या सुचना संबंधीतांना देण्यात आल्या आहेत. विद्यामान काळात शाळा, महाविद्यालय सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

‘त्या’ चौघांना जिल्हा रुग्णालयात हलविले
दुबईमधून आलेल्या नगरमधील ‘त्या’ चार जणांमध्ये कोरोनाचे लक्षण नाही. मात्र, खबरदारी म्हणून या सर्वांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, तेथेच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले असून ते पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी आणि मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

पाथर्डी, नगर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील अनेक दिंड्या अर्ध्यातूनच फिरल्या माघारी

श्री क्षेत्र पैठण येथील नाथषष्ठी निमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारा यात्रोत्सव यावर्षी जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा धोका लक्षात घेता रद्द केल्याने पाथर्डी, नगर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांतून करंजीघाट मार्गे जाणार्‍या अनेक दिंड्या तिसगाव निवडुंगे येथेच पोलीस प्रशासनाने आडवून त्यांना माघारी जाण्याचे घारगाव येथील दिंडीतील वारकरी दतात्रय निंबाळकर, विलास बांदल यांनी सांगितल्याने वारकर्‍यांना यावर्षीचा पायी दिंडी सोहळा अर्ध्यावरच सोडून माघारी परतण्याची वेळ आली आहे.

श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर तालुक्यांसह जिल्ह्यातील पुण्यात असणारे अनेक विद्यार्थी परतू लागले

दरम्यान, कोरोनाने जगाच्या अनेक देशांत धुमाकूळ घातला आहे. त्यात पुण्यातही संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात असलेल्या पाल्यांबाबत पालक काळजीत आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील पालकांनी आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, राहाता, शिर्डी, नेवासा, शेवगाव यासह जिल्ह्यातील अन्य भागांतील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शिकण्यासाठी पुण्यात आहेत. त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला जात असून माहिती घेतली जात आहे. तसेच त्यांना दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. काहींनी शाळा, महाविद्यालय प्रशासनाची परवानगी घेऊन आपल्या पाल्यांना दहा पंधरा दिवसांसाठी घरी बोलावले आहे. टेम्पररी नोकरी करणारे काही तरूणही नगर जिल्ह्यात परतण्याच्या विचारात आहेत.

राज्यातील सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश : शिर्डी, श्रीरामपूरच्या रामनवमी यात्रेवरही सावट

गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरस वेगाने पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मोठ्या यात्रा रद्द करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. गर्दी होईल अशा सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत केंद्रीय आपत्ती सचिवांकडून जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांना आदेश दिले आहेत. नगर जिल्ह्यात यात्रा-जत्रांचा मुहूर्त याच महिन्यात असतो. या पार्श्वभूमीवर या दिवसांत उत्सवाची मोठी तयारी केली जाते; परंतु करोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असताना यात्रा-जत्रेच्या माध्यमातून मोठी गर्दी करणे चुकीचे ठरणार असल्याच्या कारणातून उपनगरांतील अनेक ठिकाणच्या यात्रा-जत्रा रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. करोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रा-जत्रा उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यातून करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे यात्रा-जत्रांवर करोनाचे सावट पसरल्याचे दिसून येत आहे. एप्रिलच्या सुरूवातीलाच शिर्डी आणि श्रीरामपुरात रामनवमी यात्रा आहेे. त्यामुळे या यात्रेवरही करोनाचे सावट आहे.

पारनेरसह अन्य आठवडे बाजार बंद
कोरोनाचे सावट असून पारनेरसह तालुक्यातील अळकुटी, सुपा, निघोज आणि भाळवणी येथील आठवडे बाजार या आठवड्यात बंद ठेवण्याचा निर्णय तहसीलदार ज्याती देवरे यांनी दिले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com