Friday, April 26, 2024
Homeनगरनगरच्या मध्यवस्तीतील भाग कन्टेन्मेंट-बफर झोन

नगरच्या मध्यवस्तीतील भाग कन्टेन्मेंट-बफर झोन

4 जूनपर्यंत लागू राहणार प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहराच्या काही भागात करोना रुग्ण सापडल्याने आणि करोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना म्हणून शहराचा मध्यभागी रूग्ण सापडलेला भाग कंटेन्मेंट झोन म्हणून आणि लगतचा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.

- Advertisement -

घोषित केलेल्या कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री सेवाव बफर झोन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्तु विक्री शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून चार जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. हा भाग पत्रे उभे करून रहदारीस व येण्या जाण्यास बंद करण्यात आला आहे.

जुने मनपा कार्यालय चौक, डॉ. होशिंग हॉस्पीटल चौक, शनी चौक, तख्ती दरवाजा मस्जीद, आशा टॉकीज, पंचपीर चावडी चौक, अंबिका महिला बँक ते जुनी मनपा चौक हा भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून तर यतीम खाना बिल्डींग, न्यामत खानी मोहल्ला, निंबाळकर गल्ली, तवकल वस्ताद तालीम, श्रीपाद ग्रंथ भांडार, घुमरे गल्ली, आदर्श शाळा, माणिक चौक, कोतवाली पोलीस स्टेशन, बाळासाहेब देशपांडे दवाखाना, नांगरे गल्ली, जुना बाजार रोड, पटवेकर गल्ली, फुलसौंदर चौक, शिवम थिएटर, मनपा फायर स्टेशन, भाऊसाहेब फिरोदिया स्कूल हा भाग बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. शनी चौकातील डीपी जवळील रस्ता प्रवेशासाठीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग अधिनियम 13 मार्चपासून लागू करुन खंड 2, 3, 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. शहरातील उपरोक्त कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन या ठिकाणी महापालिका आयुक्ते सनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

या क्षेत्रामध्ये तातडीच्या वैद्यकीय सेवा व जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक व वितरण व्यवस्थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्यात आला आहे. ये-जा करणार्‍या व्यक्तींची थर्मल स्कॅनरद्वारे स्क्रिनिंग करण्यात यावी, कंट्रोल रुममध्ये रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी घ्याव्यात व नागरिकांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू सशुल्क पुरवाव्यात, या क्षेत्रातील रहिवाशांना दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे आदी बाबी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात याव्यात. त्याकामी जीवनावश्यक वस्तुंचे व्हेंडर निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतूक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बँक प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेशात म्हटले आहे.

नागरिकांमध्ये घबराट
शहराचा हा मध्यभाग दुपारपासूनच सील करण्याची तयारी सुरू होती. रस्ते बंद करण्यासाठी ठिकठिकाणी पत्रे उभे करून आडवे लावण्याचे काम सुरू होते. दुपारपासूनच दुकाने बंद करण्यास सुरूवात झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये सुरूवातीला घबराट निर्माण झाली. त्याचा परिणाम सावेडीतही जाणवला. सावेडीतही दुकाने बंद झाली. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दुकाने बंद करण्याचे सांगितले असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या