वाकोडी, निंबळक, पिंपळगाव लांडगा मार्गे करोना पुन्हा नगर तालुक्यात
Featured

वाकोडी, निंबळक, पिंपळगाव लांडगा मार्गे करोना पुन्हा नगर तालुक्यात

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील वाकोडी, निंबळक पिंपळगाव लांडगा येथे करोनाचा शिरकाव झाला असून मुंबई येथून आलेल्या नागरिकांमुळे नगरकरांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, विलगीकरण प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जात नसल्याने तहसीलदार उमेश पाटील यांनी निंबळक येथील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना नोटिसा बजावल्या आहेत.

वाकोडी येथे मुंबईहून आलेल्या 41 वर्षीय व्यक्तीला व निंबळक येथील तीस वर्षीय गरोदर महिलेला करोनाची लागण झाली असल्याचे नगर तालुका आरोग्य अधिकारी ज्योती गाडे-मांडगे यांनी सांगितले. दरम्यान, वाकोडी येथील बाधित व्यक्ती मुंबईहून लपून छपून प्रवास करत बायकोला भेटाण्यासाठी आली होती. आलमगीर वगळता तालुक्यातील इतर गावे करोनामुक्त होती. वाकोडीतील व्यक्ती 18 तारखेला मुंबईहून आला.

गुपचूप आल्यामुळे दोन दिवसांनी याची माहिती वाकोडी आपत्ती व्यवस्थापन समितीला समजली. यानंतर त्याला क्वारंटाइन करण्यात आले. त्रास होवू लागल्याने त्याच दिवशी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.

निंबळक येथील 30 वर्षीय गरोदर माहिला चेंबूर येथे भावाकडे राहत होती. तीला नगर येथे आणण्यासाठी तिचा पती गेला होता. निंबळकमध्ये येत असताना वाटेतच त्या गरोदर महिलेला त्रास वाटू लागल्याने तीच्या पतीने मुबईहून थेट नगरच्या जिल्हा रुग्णालयात तीला दाखल केले. यानंतर तीचा पती घरी निंबळक येथे गेला होता. आज सकाळी ही महिला करोना पॉझिटिव असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

निंबळकमध्ये करोनाच्या लागण झाल्याचे वृत्त कळताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. तीचा पती व त्याच्या संपर्कात आलेला वडगावगुप्ता येथील गाडीचा ड्रॉयव्हर, सासू यासह अन्य दोन तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. वाकोडी व निंबळक हे दोन्हीही ठिकाणे कन्टेनमेन्ट झोन घोषित करण्यात आले आहे.

पिंपळगाव लांडगा येथेही मुंबईहून आलेल्या 63 वर्षीय व्यक्तीस करोनाची लागण झाली. रात्री उशीरा याबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.दरम्यान नगर तालुक्यात मुंबई, पुणे या रेडझोनमधून येणार्‍या नागरिकांचे प्रमाण वाढले असून गावात आल्यानंतर ते क्वारंटाईन होण्यास विरोध करत असल्याचे समोर आले आहे. नातेवाईकांसह राजकीय नेतेही यासाठी हस्तक्षेप करत आहेत. ग्रामसुरक्षा समितीलाही हे लोक दाद देत नसून यामुळे ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांमध्ये करोनाला आमंत्रण मिळू लागले आहे.

निंबळकला सरपंच, ग्रामसेवक, तलाठीला नोटिसा
निंबळक येथे रेड झोनमधून येणार्‍या नागरिकाना शाळेत विलगीकर कक्षामध्ये दाखल न केल्यामुळे तहसीलदार उमेश पाटील यांनी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. सासरेबुवा, पुढार्‍यांच्या हस्तक्षेपामुळे रेड झोनमधून आलेले नातेवाईक क्वारंटाईन होईनात. या बाबत दै. सार्वमतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दाखल घेऊऩ भरारी पथकाने निंबळकला पाहणी केली. येथे बाहेरगावहून बरेचजण आले असताना, काही ठराविक लोकांनाच क्वारंटाईन केल्याचे निदर्शनास आले. क्वारंटाईन होत नसलेल्यांना नोटीस बजावाव्यात, तसेच नोटीसची दखल न घेतल्यास आश्रय देणार्‍या व बाहेर येणार्‍या व्यक्तिवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ग्राम सुरक्षा समितीला भरारी पथकाने दिले. गुन्हे दाखल करण्यास ग्रामसुरक्षा समितीने हालगर्जीपणा केल्यास समितीवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.

गावात येऊनही माहिती लपविली
नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे एक करोना पॉझिटीव्ह रूग्ण असल्याचे रात्री उशीरा स्पष्ट झाले. हा रूग्ण 20 मे रोजी मुंबईहून गावात आला होता. आरोग्य यंत्रणेला माहिती मिळाल्यानंतर ते चौकशीसाठी गेले. वस्तीवर रहात असलेल्या या रूग्णाच्या नातेवाईकांना असे कोणी आले नसल्याची खोटी माहिती दिल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती मांडगे यांनी सांगितले. आता मात्र त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

वाकोडीचा बाधित मुंबईचा पोलीस
वाकोडीत आढळलेली बाधित व्यक्ती मुंबई येथे पोलीस कर्मचारी आहे. त्यांनी आठ दिवसांपूर्वी मुलांना नातेवाईकांकडे तर पत्नीला वाकोडीत पाठविले. या तरुणाबरोबर सुपा, कोयाळ पिंपळा व जालना येथील चार मित्र पळून आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com