जिल्ह्यात बाधितांचा आकडा दोनशेपार

जिल्ह्यात बाधितांचा आकडा दोनशेपार

आणखी 9 पॉझिटिव्ह : नगर शहर, संगमनेर, राहाता, शेवगावमधील रुग्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांचा आकडा हळूहळू वाढत शनिवारी 207 वर पोहचला आहे. शनिवारी सकाळी जिल्ह्यातील आणखी 9 व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बाधितांमध्ये नगर शहर, संगमनेर, राहाता, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.

यासह करोनासंदर्भातील आयसीएमआरच्या पोर्टलवर संगमनेरच्या दोन आणि कोपरगावच्या महिला डॉक्टरचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची नोंद झाली असल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा वाढल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

शुक्रवारी दिवसभरात करोनाचा एकही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता. उलट 61 अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, शनिवारी सकाळीच जिल्ह्यात नव्याने 9 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयातील करोना तपासवणी प्रयोग शाळेतून आला. या तपासणी अहवालानुसार नगर शहरातील स्टेशन रोड येथील 71 वर्षीय पुरुष, कोठी (माळीवाडा) येथील 13 वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा करोना बाधित सापडला.

पाथर्डी तालुक्यात चेंबूर मुंबई येथून चिंचपूर इजाडे येथे आलेले 40 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय मुलगा यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे येथील 32 वर्षीय युवक बाधित झाला असून तो यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहे. संगमनेर शहरात पुन्हा शनिवारी एक करोनाचा रुग्ण सापडला असून शहरातील एका 40 वर्षी व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे.

हा व्यक्ती यापूर्वी बाधित असणार्‍या व्यक्तीच्या संपर्कातील आहे. शेवगाव तालुक्यात चेंबूर मुंबई येथून लांडे वस्ती येथे आलेला 27 वर्षीय युवक बाधित निघाला असून कळवा (ठाणे) येथून अधोडी येथे आलेली 45 वर्षीय व्यक्ती करोना बाधित आढळला आहे.

गुरूवारी जिल्ह्यातील 195 बाधित व्यक्तींचा आकडा शुक्रवारी 9 पॉझिटिव्ह अहवालामुळे 204 वर पोहचला. त्यात संगमनेरच्या दोघे आणि कोपरगावमधील महिला डॉक्टर यांची भर पडल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 207 वर पोहचली आहे.

बाधितांची संख्या 207
जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार शनिवारी दुपारअखेर जिल्ह्यात 207 करोना बाधित व्यक्ती आहेत. यात महानगरपालिका क्षेत्रात 46 आणि उर्वरित जिल्ह्यात 104, इतर राज्य 2, इतर देश 8 इतर जिल्हा 47 रुग्णांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 87 अ‍ॅक्टिव्ह केसेस असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय, बुथ हॉस्पिटल, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, शिर्डीतील दोन आणि संगमनेरच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

2 हजार 904 नमुने तपासणी
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 904 संशयीत करोना बाधितांच्या स्त्राव नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील 2 हजार 634 अहवाल निगेटिव्ह आले असून 26 रिजेक्टेड आणि 18 निष्कर्ष न निघालेले आणि 26 अहवालाची शनिवारी रात्रीपर्यंत प्रतिक्षा असल्याचे जिल्हा जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले.

करोनावर मात करणार्‍यांचेही शतक
जिल्ह्यात 12 मार्चला करोनाचा पहिला बाधित रुग्ण सापडला होता. तेव्हापासून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमळे जिल्ह्यात करोनाचा उद्रेक रोखण्यात यश आले. जिल्ह्यात आतापर्यंत 109 रुग्णांनी करोनावर मात केली असून शनिवारी त्यात 14 रुग्णांची भर पडली. काल करोनामुक्त झालेल्यामध्ये राहाता तालुक्यातील 5, अकोले तालुक्यातील 2, संगमनेर तालुक्यातील 3 तर पारनेर, शेवगाव, राहुरी आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एक अशा रुग्णाचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com