Friday, April 26, 2024
Homeनगरगटनेता बदलाचा निर्णय ठरला थोरात गटासाठी विजयाची किल्ली

गटनेता बदलाचा निर्णय ठरला थोरात गटासाठी विजयाची किल्ली

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची शिष्टाई यशस्वी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेसचा गटनेता बदलणे काँग्रेसमधील बाळासाहेब थोरात यांच्या गटासाठी विजयाची किल्ली ठरली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना एकत्र आणून त्यांची बैठक घेऊन त्यातून समन्वय करण्याची भूमिका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी यशस्वी ठरवली.

- Advertisement -

नगर जिल्हा परिषदेत भाजप आणि पर्यायाने विखे यांच्या विरोधात महाविकासआघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्यातील नाशिक, सातारा येथील सत्ता समिकरणामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसनेेचे नेते बैठकीसाठी एकत्र येत नव्हते. यामुळे नगर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या समिकरणासाठी अडचणी होत्या. तिनही पक्षातील संवादाची गरज ओळखून नगर जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तांबे यांना समन्वयासाठी पुढाकार घेतला.

सातारा जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असून त्या ठिकाणी सेनेला सभापतिपद हवे होते. तर नाशिकमध्ये सेना आणि राष्ट्रवादी सत्तेत होती. त्या ठिकाणी काँग्रेसला पद हवे होते. या अडचणीमुळे तिनही पक्षाचे नेते एकत्र येत नव्हते. याचा परिणाम नगरच्या सत्ता समिकरणावर होणार असल्याचे लक्षात येताच, तांबे यांनी यासाठी पुढाकार घेत नगरसाठी तिनही पक्षाच्या नेत्यांची बैठक घडवून आणत सन्मवय साधला.

याच दरम्यान, चाणाक्षपणे खेळी खेळत जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या गटनेत्या आशा दिघे यांचा राजीनामा घेवून त्या ठिकाणी थोरात गटाचे अजय फटांगरे यांची वर्णी लावण्यात आली. यामुळे विखे गटाला ऐन मोक्याच्या क्षणी चेक बसला. गटनेतेपद हातून गेल्यामुळे जिल्हा परिषदेत विखे गट हतबल झाला. तांबे यांच्या या खेळीमुळे जिल्हा परिषदेत थोरात गट वर्चस्व निर्माण करण्यात यशस्वी ठरला.

युवक राष्ट्रवादीची धावपळ
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी दोन दिवस मोठी धावपळ केली. जिल्हाध्यक्ष कपिल पवार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्यावर पक्षाकडून जबाबदारी सोपविण्यात आली होती. यानुसार पक्षाच्या सदस्यांची सहल ते राष्ट्रवादीचे प्रतोद कैलास वाकचौरे यांना स्वगृही आणण्यात या पदाधिकार्‍यांचा मोठा वाटा होता.

निवडीनंतर महापुरूषांना अभिवादन
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर नूतन पदाधिकारी राजश्रीताई घुले आणि उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, विशाल गणपती, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

नेत्याकडून आभार
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या आवारात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आभार सभेचे आयोजन केले होते. यावेळी आ. रोहित पवार, ज्येष्ठ नेते अंकूश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, घनशाम शेलार यांनी सर्वांचे आभार मानले.

आता बांधकाम समितीसाठी फिल्डींग
जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता सत्तेत सहभागी राजकीय पक्षांचा डोळा अर्थ आणि बांधकाम समितीच्या सभापतिपदावर आहे. ही समिती आपल्या ताब्यात यावी, यासाठी राष्ट्रवादी, सेना आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये रस्सीखेच असून यावर वरिष्ठ नेत्यांना मुंबईत बसून निर्णय घ्यावा लागणार आहे.

शेळकेंच्या रुपाने दक्षिणेला न्याय
जिल्हा परिषदेत थोरात गटाने जिल्ह्याच्या दक्षिण भागाला प्रताप शेळके यांच्या उपाध्यक्षपदाच्या रुपाने न्याय दिला. गेल्या अनेक वर्षांपासून नगर तालुक्यातील शेळके कुटुंबाला पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली गेली नव्हती. आता जिल्हा परिषद उपाध्यक्षपदामुळे ना.थोरातांनी दक्षिणेत काँग्रेस पक्ष बळकटीसाठी पावले टाकली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या