जप्त केलेली वाहने ताब्यात घेण्यासाठी तोबा गर्दी
Featured

जप्त केलेली वाहने ताब्यात घेण्यासाठी तोबा गर्दी

Sarvmat Digital

सर्व कागदपत्र तपासून वाहने देण्याची पोलिसांकडून कार्यवाही सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी) –  लॉकडाऊन चार मध्ये शासनाने शिथिलता आणल्यानंतर नुकसान नको म्हणून पोलीस प्रशासनाने जप्त केलेली वाहने मालकाच्या हवाली करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू केली आहे. आरसी बुक, आधार व इतर कागदपत्रांची पूर्तता करणार्‍यांची वाहने पोलिसांनी सोडली. दरम्यान वाहन मालकांवर 188 कलमान्वये गुन्हा कायम असून तो खटला न्यायालयात पाठविला जाणार आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी 24 मार्चला देशात लॉकडाऊन जाहीर झाले. त्यात खासगी वाहनांना रस्त्यावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र ही बंदी जुगारून अनेक वाहने रस्त्यावर आली. रस्त्यावर आलेल्या या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत ती ताब्यात घेतली. संबंधित वाहन मालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 188 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळामध्ये खासगी वाहनांचा वापर करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी पोलिसांनी करावी, असे सांगितले होते. मात्र दुसरीकडे अनेक नागरिकांनी वेगळ्या माध्यमातून वाहनांचा वापर सुरू केला होता. पोलीस वाहनांवर कारवाई करत असल्याने शहरात मोकाट फिरणार्‍यांची संख्या कमी झाली होती. तरीही नगर शहरामध्ये दुचाकी व चारचाकी अशी सुमारे दोन हजार 700 वाहने तोफखाना, कोतवाली व भिंगार पोलिसांनी जप्त केली होती.

गत दोन महिन्यांपासून जप्त केलेली ही वाहने पोलीस ठाण्यात लावली आहेत. उन्हाचा वाढता पारा व आगामी पावसाळा पाहता ही वाहने मालकाच्या ताब्यात देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. वाहने ताब्यात घेण्यासाठी पोलिस स्टेशनच्या बाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे.

वाहनांची मालकी दाखविणारे कागदपत्रे व कायदेशीर परिपूर्णता असलेली वाहने पोलिसांनी मालकाच्या ताब्यात दिली. मात्र ज्या मालकाने अपूर्ण कागदपत्रे दिली त्यांच्यावर मोटार वाहन कलमान्वये दंडात्मक कारवाई केली. पोलीस दप्तरी नोंदविलेला 188 कलमान्वये गुन्हा कायम असून तो खटला न्यायालयात पाठविला जाणार आहे.

गाडीचे नुकसान नको म्हणून जप्त वाहने मालकाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन शिथील झाल्याने सिंगल सीट वाहने वापरता येणार आहेत. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांकडून पोलिसांनी कायदेशीर दंड आकारणी केली. न्यायालयात 188 चा खटला पाठविला जाणार आहे.
– संदीप मिटके, शहर पोलीस उपअधीक्षक

वाहन परवाना नसलेल्यांना दंड
वाहनाचे आरसी बुक, गाडी चालविण्याचा परवाना आणि नंबर प्लेट कायद्याच्या चाकोरीत आहे की नाही याची तपासणी पोलीस करत होते. या तपासणीनंतरच पोलिसांनी वाहन मालकाच्या ताब्यात दिले. वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्यांना पोलिसांनी दंड आकारला.

सोशल डिस्टन्सिंगची एैशीतैशी
वाहने ताब्यात मिळणार असल्याने नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर एकच गर्दी केली. वाहनाची कागदपत्रे हातात घेऊन महिला, पुरूष, तरूण, तरूणींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. गर्दी जास्त झाल्याने तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यावेळी सर्व गर्दी प्रवेशद्वाराभोवती जमा झाली. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून आले.

Deshdoot
www.deshdoot.com