धांदरफळ बुद्रुक : जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी
Featured

धांदरफळ बुद्रुक : जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

Sarvmat Digital

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील 67 वर्षीय इसमाचा करोनाबाधीत होऊन मृत्यु झाला. या घटनेने संगमनेर पुन्हा एकदा हादरले. त्यातच 7 करोनाबाधीत व्यक्ती आढळल्याने जिल्ह्याचे लक्ष संगमनेरने वेधले. या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्यासह धांदरफळ बुद्रुक गाठले. परिस्थितीची माहिती घेतली.

त्यानंतर संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत धांदरफळ बुद्रुक पुर्णत: लॉकडाउन करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी केला आहे. धांदरफळ येथील सदर व्यक्तीच्या अंत्यविधीस गेलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे. तर सात व्यक्तींना धांदरफळ येथील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी धांदरफळ बुद्रुक गावठाणला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान दुपारी जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, उपाधीक्षक दिपाली काळे, डीवायएसपी रोशन पंडित, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यांनी भेट दिली. यावेळी तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, धांदरफळचे सरपंच भानुदास शेटे, दक्षता समिती सदस्य दत्ता कासार, मंडलाधिकारी विवेक रासने, कामगार तलाठी मंगल डोंगरे, जवळेकडलग आरोग्य केंद्राच्या तसेच धांदरफळ उपकेंद्राच्या सर्व आरोग्य वैद्यकीय अधीक्षक, आरोग्यसेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, माजी उपसरपंच अविनाश वलवे, ग्राम विकास अधिकारी अशोक वर्पे, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

काल संपूर्ण गावात सोडियम हायड्रोक्लोराईड फवारणी करण्यात आली. गावातील संपूर्ण रस्ते, येणारे प्रवेशद्वार पत्रे लावून बंद करण्यात आले. तसेच प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करून घेण्यात येत आहे. सहा व्यक्तींना वृंदावन चंदनापुरी येथील विलगीकरण कक्षात तर दोन व्यक्तींना धांदरफळ बुद्रुक या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. पोलीस, आरोग्य, महसूल व ग्रामपंचायत प्रशासन परीस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.

उद्योजक बाळासाहेब देशमाने यांच्या माध्यमातून फवारणीचे काम तसेच पोलीस प्रशासनास मास्क, हॅन्ड ग्लोज, निर्जंतुकीकरण औषध देण्यात आले आहे. ज्या व्यक्ती मयत व्यक्तींच्या कुटुंबाच्यां संपर्कात आलेल्या आहेत त्या व्यक्तींनी स्वत:हून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com