विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर
Featured

विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर

Sarvmat Digital

कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना : बोगस स्टीकर लावून फिरणारेही आढळले

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्य व केंद्र सरकारने 14 एप्रिलपर्यत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. खासगी वाहतूक आणि खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. असे असतानाही नगर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात विनाकारण दुचाकी अथवा चारचाकी घेऊन नागरिक घराबाहेर पडत असल्याने त्यांना शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी चांगलाच दणका दिला.

द्विवेदी यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. कोरोनाचा प्रभाव वाढत असताना जिल्हावासियांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे असताना अतिउत्साही नागरिक प्रतिबंधात्मक कायद्याचा भंग करुन इतर नागरिकांची सुरक्षितता आणि आरोग्य धोक्यात घालण्याचे काम करीत आहेत. यापुढे विनाकारण असे नागरिक रस्त्यावर दिसले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूवी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्रे, विविध आस्थापना, सर्व प्रकारची दारु विक्री दुकाने 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश आहेत.

मात्र, लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिलपर्यंत असल्याने या आणि यापूर्वी जारी केलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशांची मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविली आहे. मात्र, असे असतानाही विनाकारण नागरिक दुचाकी किंवा चारचाकी घेऊन रस्त्यावर येतानाचे चित्र अऩेक ठिकाणी दिसत आहे. वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश द्विवेदी यांनी दिले. प्रेस, मेडिकल यूजरचे बोगस स्टिकर लावून वाहनातून अऩेकजण फिरत असल्याचे या तपासणीत समोर आले. एवढेच नव्हे, तर एका वाहनावर ‘माजी खासदार’ असेही म्हटले होते. या सर्व वाहनांवर कारवाई करण्यात आली.

तसेच, एका चारचाकी वाहनावर माजी खासदार असे स्टिकर लावलेले होते. त्या वाहनाला धरती चौकात जिल्हाधिकारी यांनी अडवले. विनाकारण फिरत असल्याने खासदाराच्या चालकासह कार्यकर्ते व चारचाकी वाहन ताब्यात घेतली. वाहनांवर बोगस स्टिकर लावून फिरणार्‍यांवर कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत करीत असताना आणि 90 टक्क्यांहून अधिक नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत असताना केवळ 10 टक्के व्यक्ती विनाकारण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांचा मूळ उद्देश मागे पडण्याची भीती आहे. नागरिकांनी स्वतःहून आता अनावश्यक बाहेर पडणे टाळावे.

जीवनावश्यक वस्तू, किराणा माल घेण्यासाठी दुचाकी किंवा चारचाकी वापरण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या घराजवळच्या दुकानातून पायी जावून या वस्तूंची खरेदी करावी. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाईल, याची काळजी घेणे आवश्यक आहे. यापुढे प्रतिबंधात्मक आदेशाची पायमल्ली करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

पासेचा दुरूपयोग केल्यास कारवाई
जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला तसेच दूध आदी वाहतुकीसाठी अत्यावश्यक सेवेअंतर्गत पासेस देण्यात आले आहेत. अशा पासेसचा दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या व्यक्तींविरुद्धही कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्यासह शहरातील विविध भागांना भेटी दिल्या. मुकुंदनगर, कोटला स्टॅन्ड, सर्जेपुरा, बागडपुरा, दिल्लीगेट, नेप्तीनाका चौक, आयुर्वेद कॉर्नर, मार्केटयार्ड चौक, माळीवाडा आदी भागात जाऊन विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांना रोखले आणि त्यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले.

माजी खासदाराच्या वाहनावरही कारवाई

गांधी यांच्याकडून जिल्हाधिकारी, पोलिसांचा निषेध

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुळे संचारबंदी असल्याने कोणालाही रस्त्यावर येण्यास परवानगी नाही. सर्वसामान्यांना यासाठी रोखून कारवाई केली जात असतानाच शुक्रवारी माजी खासदार दिलीप गांधी यांच्या वाहनाला व त्यातील चालक व स्वीय सहायकावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, गांधी यांनी मात्र प्रशासनाच्या या कारवाईवर आक्षेप घेतला आहे.

गांधी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोरोनाचे संकट थोपण्यासाठी सरकार चांगले काम करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना व मदत कार्याला सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष सामाजिक जाणीवेतून नागरिकांना मदत करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय व प्रदेशच्या वरिष्ठ नेते, पदाधिकारी या मदत कार्यात सहभागी आहेत. तसेच त्यांनी देशभराच्या कार्यकर्त्यांनाही तशा सूचना केल्या आहेत.

त्यानुसार नगर शहरातील गरजू नागरिकांच्या घरी अन्न पोहचविण्याचे काम सुरु केले आहे. तसेच शहरातील काही भागात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यासाठी मोफत सोडियम क्लोराईड केमिकल व टँकर उपलब्ध करून दिले आहे. प्रशासनाला मदतीसाठीच हे काम सुरु केले आहे. असे असतांना शुक्रवारी सकाळी हातमपुरा येथे माझे स्वीय सहायक व ड्रायव्हरला गाडी अडवून पोलिसांनी मारहाण केली.

स्वीय सहाय्यक रोषण गांधी यांनी आम्ही अन्नदान कारुन फवारणीसाठी सोडियम क्लोराईड आणण्यास चालल्याचे सांगितले तरीही पोलिसांनी मारले. शहरात लॉकडाऊन असतांनाही सामाजिक काम करण्यासाठी लोक गाड्यांतून फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई होतांना दिसत नाही. माझ्याच लोकांवर कारवाई करून लगेच सोशल मीडियावर फोटो टाकून मला बदनाम करण्याची पोलिसांची व जिल्हाधिकार्‍यांची भूमिका योग्य नाही.

या बाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली असल्याचे गांधी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलेल्या कारवाईचा मी निषेध करत आहे. लॉकडाऊन काळात ते स्वतः नियम पाळतांना दिसत नाहीत. पाहणी करण्यास जाताना त्यांच्यासमवेत मोठ्या संखेने पोलीस असतात. यावेळी ते कोणताही सोशल डिस्टंन्सिंगचा नियम पाळत नाहीत. तोंडाला मास्क लावत नाहीत, असा आरोपही गांधी यांनी केला.

Deshdoot
www.deshdoot.com