अन् कलेक्टरांनी दिले जखमी घुबडाला जिवदान…
Featured

अन् कलेक्टरांनी दिले जखमी घुबडाला जिवदान…

Sarvmat Digital

जखमी पिंगळ्याला निसर्गप्रेमी सातपुतेंच्या मदतीने जीवदान

अहमदनगर (प्रतिनिधी) – कलेक्टर राहुल द्विवेदी यांच्या बंगल्याच्या आवारातील हौदात पडलेल्या पिंगळा जातीच्या घुबडावर निसर्गप्रेमी जयराम सातपुते यांनी उपचार करून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. चार दिवसांच्या उपचारानंतर घुबडाला कलेक्टर द्विवेदी यांच्या हस्ते बंगल्याच्या आवारातूनच निसर्गात मुक्त करण्यात आले.

जखमी झालेले एक पिंगळा प्रजातीचे घुबड भरदुपारी जिल्हाधिकारी निवासाच्या आवारातील हौदात पडल्याचे तेथील कर्मचारी ज्ञानेश्वर ढेसले व पोलीस कॉन्स्टेबल अमोल घंगाळे यांना दिसले. नाकातोंडात पाणी गेलेल्या त्या जखमी घुबडाला कर्मचार्‍यांनी वर काढले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या सांगण्यावरून जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राचे निसर्गअभ्यासक जयराम सातपुते यांना याबाबत लगेचच कळविण्यात आले.

त्यानंतर सातपुते 10 मिनीटांतच तेथे पोहचले. अगदी गंभीर स्थितीतील त्या पिंगळा घुबडाचे प्राण वाचणे कठीण होते. तरीही त्यावर योग्य उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान कलेक्टरांनी अनेकवेळा सातपुते यांच्याशी संपर्क साधून घुबडाच्या प्रकृतीची चौकशी केली. चौथ्या दिवशी ते ठणठणीत झाले. कलेक्टर राहुल द्विवेदी यांच्या हस्ते त्यांच्याच प्रांगणातून त्या पिंगळा प्रजातीच्या घुबडाला निसर्गात मुक्त करण्यात आले. त्यापूर्वी कलेक्टरांनी त्याच्याशी 5 मिनीटे संवादही साधला. प्रशासकीय कामात हातखंडा असणार्‍या कलेक्टरांचे निसर्गप्रेमही यानिमित्ताने समोर आले आहे.

घुबडांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे.त्यामुळे कलेक्टर व त्यांच्या कर्मचार्‍यांनी निसर्गाला केलेली ही मदत अमूल्य आहे. यापूर्वीही कलेक्टरांनी अनेक निसर्गसंवर्धन उपक्रमात वेळोवेळी सहकार्य करून सतत प्रेरणा दिली आहे.
– जयराम सातपुते, पक्षी अभ्यासक

Deshdoot
www.deshdoot.com