सहकारी संस्थांच्या संचालकांसह अधिकार्‍यांची ‘कुंडली’ जमा करा
Featured

सहकारी संस्थांच्या संचालकांसह अधिकार्‍यांची ‘कुंडली’ जमा करा

Sarvmat Digital

सहकार विभागाचा आदेश : कारण मात्र अस्पष्ट

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह 25 हजारांपेक्षा जास्त वेतन घेणार्‍या अधिकार्‍यांची पूर्ण माहिती व आधार कार्ड क्रमांक इत्यादी माहिती तातडीने मागवली आहे. ‘कुंडली’ जमा करण्याच्या या आदेशाची सध्या सहकार वर्तुळात चर्चा आहे. ही माहिती शेतकरी कर्जमाफी संदर्भाने संकलीत केली जात आहे की अन्य काही कारण आहे, हे स्पष्ट नसल्याने अनेकजण सध्या गोंधळले आहेत.

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि.23 डिसेंबर रोजी सर्व जिल्हा उपनिबंधकांना सदर माहिती तातडीने कळवावी असे आदेश दिले आहेत. नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील या बाबीशी निगडित सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध संघ, सहकारी बाजार समित्यांना त्या त्या तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना माहिती जमा करून पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

नेवासा येथील सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे यांनी दि. 24 रोजी तालुक्यातील सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, बाजार समिती यांना संचालक मंडळ व अधिकारी यांची माहिती व आधार कार्ड नंबर तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com