Friday, April 26, 2024
Homeनगरपतसंस्थेच्या नियामक मागणीबाबत चर्चा करून मार्ग काढू : सहकारमंत्री

पतसंस्थेच्या नियामक मागणीबाबत चर्चा करून मार्ग काढू : सहकारमंत्री

शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार संवाद व राज्यव्यापी मेळावा

विदर्भातील सदस्यांचा मागणीचा नामोल्लेख टाळल्याने गदारोळ
ठोस निर्णय न झाल्याने अनेकांनी व्यक्त केली नाराजी

- Advertisement -

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – पतसंस्थेत ग्राहकांच्या ठेवीवरील व्याजदरात वाढ देण्यासाठी एकमेकांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहे. पतसंस्थेच्या नियामक मंडळाच्या मागणीसंदर्भात आपण एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढू, असा विश्वास व्यक्त करत असतानाच विदर्भातील उपस्थित काही मंडळींनी नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीचा नामोल्लेख टाळल्याने मोठा गदारोळ झाला आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना मंचावरच प्रलंबित प्रश्नावर बोलण्यास भाग पाडले.

या परिषदेत ठोस निर्णय घेतला गेला नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या राज्यव्यापी परिषदेस जिल्ह्यातील मंत्री तसेच खासदार आमदारांनी पाठ फिरवल्याने चर्चेचा विषय ठरला.

महाराष्ट्र शासन सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 रोजी साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीत आंतरराष्ट्रीय सहकार संवाद व राज्यव्यापी सहकार संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नांदेड येथील शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, श्रीमती इलेनीता सँड्राँक, पी. एल. खडांगळे, काका कोयटे, परितोष पौडियाल, बी. एच. कृष्णा रेड्डी, ज्योती लाटकर, उदय जोशी, सुरेश वाबळे, सुकेश झंवर, मुकुंद तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्जमाफीतील दोन टक्के सेवाशुल्क सहकारी संस्थांना

सहकार मोडण्यासाठी भाजपाने जोर लावला

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – राज्यातील सहकारी संस्थांना कर्ज माफीतील दोन टक्के रक्कम सेवाशुल्क म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यातून सहकारी संस्थांच्या सचिवांचे पगार व संस्था चालविण्यासाठी रक्कम उभी होणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. त्यांनी भाजपावर सहकार चळवळ मोडण्यासाठी जोर लावल्याचा आरोप केला.

येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ना. पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांत भाजपने सत्तेत असताना सहकार क्षेत्र मोडकळीस आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. भाजपने प्रत्येक व्यक्तीकडे संशयाने पाहत दुजाभाव केला. प्रास्ताविक राजूदास जाधव यांनी केले. ना. पाटील यांनी सांगितले की, पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सेवा देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था चळवळीत युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. यावेळी काका कोयटे यांनी सांगितले की, राज्यात 16 हजार पतसंस्था कार्यरत असून 2 लाखांवर पदाधिकारी आहे. पतसंस्थेच्या वसुलीसाठी गतिमान कायदा अमलात आणावा तसेच पतसंस्थेचे ध्येय धोरणाबाबत माहिती देत एनपीएचे निकष एक वर्षापर्यंत वाढवून मिळावे, अशी मागणी केली आहे.

राज्यस्तरीय मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या महिला सबलीकरण समिती अध्यक्षा अंजलीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांना व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करणारी सहकार उद्यमी नावाच्या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. सहकार उद्यमीच्या माध्यमातून महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करता येतील अशा पाच हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतच्या मशिनरीचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात सात प्रकारच्या विविध मशिनरी असून या मशिनरी चालविण्याचे प्रशिक्षण जागेवर देण्यात येत आहे. केवळ प्रशिक्षण देऊन आम्ही थांबणार नसून महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाचे पॅकिंग ब्रँडिंग देखील सहकार उद्यमी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान पतसंस्था फेडरेशचे अध्यक्ष काका कोयटे यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यातील एकाही मागणीबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याने राज्यातील उपस्थित हजारो पतसंस्था चालक तसेच कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या