Friday, April 26, 2024
Homeनगरखंडकरी शेतकर्‍यास लाच मागितली; कुळ कायदा लिपीक लाचेच्या जाळ्यात

खंडकरी शेतकर्‍यास लाच मागितली; कुळ कायदा लिपीक लाचेच्या जाळ्यात

पारनेरातील घराची तपासणी, दोन दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर (प्रतिनिधी) –  खंडकरी शेतकर्‍यांना जमीन मिळवून देण्याच्या प्रकरणात मदत करून ते मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ कायदा शाखेच्या लिपीकाने शेतकर्‍याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपीकाला सोमवारी (दि. 8) अटक केली आहे. सुनील बाबुराव फापाळे (वय- 48 रा. पारनेर) असे अटक केलेल्या लिपीकाचे नाव आहे. त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

दरम्यान, फापाळे यांच्या पारनेर तालुक्यातील घराची झाडाझडती सुरू होती. यासंदर्भात संबंधित पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील 74 खंडकरी शेतकर्‍यांना 419 एकर 19 गुंठे जमीन मूळ गावी न देता तालुक्यातील इतरत्र ठिकाणी देण्याचे सरकारने जाहीर केले. त्यानुसार प्रगतिशील शेतकरी लालमोहंमद जहागीरदार यांनी वळदगाव येथे दहा एकर सात गुंठे जमीन मिळावी म्हणून, शेती महामंडळामार्फत प्रांताधिकारी श्रीरामपूर यांच्याकडे मागणी अर्ज दाखल केला होता.

सदरचा मागणी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठविण्यात आला.तांत्रिकदृष्ट्या जहागीरदार यांचा अर्ज हा तीन वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुरुस्तीसाठी परत आला. अंतिम जमीन वाटप प्रक्रिया मंजूर करण्यात आली. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ शाखेतील अव्वल कारकून फाफाळे यांनी जमीनीचे प्रकरण आर्थिक रक्कमेसाठी दडपून ठेवले.

हे जहागीरदार यांच्या लक्षात येताच तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ शाखेशी संपर्क साधून फाफाळे यांच्याशी चर्चा केली असता फाफाळे यांनी पन्नास हजार रूपये दिल्याशिवाय प्रकरण श्रीरामपूर प्रांत कार्यालयात पाठवणार नसल्याचे ठणकावून सांगितले. जहागीरदार यांनी वरील प्रकरणी दिनांक 3 मार्च ते 9 मार्च या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्याप्रमाणे लाचलुचपत विभागाने वस्तुस्थिती बारकाईने तपासून अखेर काल जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचून फाफाळे यांना अटक केली.

फापाळे विरोधात नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 (संशोधन) सन 2018 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक नगर विभागाचे उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस हवालदार तनवीर शेख, हारूण शेख, पोलीस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, महिला पोलीस राधा खेमनर यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या