नगराध्यक्ष, नगरसेवकांना शहरात फिरण्यास बंदी !
Featured

नगराध्यक्ष, नगरसेवकांना शहरात फिरण्यास बंदी !

Sarvmat Digital

जिल्हाधिकार्‍यांचे मुख्याधिकार्‍यांना आदेश

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली. या काळात नगराध्यक्ष, नगरसेवक यांना शहरात फिरण्यास जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे. तसे आदेश पालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत.

श्रीरामपुरातील काही नगरसेवक चार चाकी वाहनांवर अत्यावश्यक सेवा असा कागद लावून शहरात सारखे फिरत असतात. त्यांच्या सोबत लोकही असतात. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे वाहनांच्या फोटोसह तक्रारी करताच जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूर पालिकेचे मुख्याधिकारी सलिम शेख यांना संचारबंदी काळात पालिकेच्या पदाधिकारी यांनी घरातच रहावे, घरी राहून कामकाज करावे, रस्त्यावर फिरण्यास बंदी आहे.

अशा सूचना दिल्या. त्यानुसार श्री. शेख यांनी नगरसेवकांना तोंडी कळविले असून सोमवारी सर्व नगरसेवकांना लेखी कळविण्यात येणार असल्याचे सांगितले.

अत्यावश्यक सेवा पासचा सुळसुळाट
शहरात अनेक वाहनांवर अत्यावश्यक सेवा असा कागद चिटकाविलेला असतो. त्यात काही नगरसेवकांच्या वाहनांचा समावेश आहे. त्याचबरोबर प्रेस, डॉक्टर असेही लिहिलेले वाहने शहरात घिरट्या घालतात. अशा वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com