मोकाट जनावरे रस्त्यावर पुन्हा ठाण मांडणार
Featured

मोकाट जनावरे रस्त्यावर पुन्हा ठाण मांडणार

Sarvmat Digital

महापालिकेने नेमलेल्या खासगी संस्थेने काम थांबविले

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेचे स्वच्छता अभियान कसे दिखावू होते, त्याचे एक एक नमुने समोर येऊ लागले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशामुळे रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अभियान काळात याचा ठेका खासगी संस्थेला देण्यात आला. मात्र आता मुदत संपल्याने ठेकेदाराने काम बंद केले असून नगरकरांना पुन्हा चौकाचौकात ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांमधून आपला जीव वाचवत मार्ग काढावा लागणार आहे.

शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर, चौकात मोकाट जनावरांचा कळप ठाण मांडत असे. यामुळे अनेकदा किरकोळ अपघातही झालेले आहेत. नगरसेवकांसह नागरिकांनी सातत्याने मागणी करूनही महापालिकेने याबाबत कधीच गांभीर्याने घेतले नाही. मात्र केंद्र सरकारकडून स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी पथक येणार असल्याने आणि त्यात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे अनिवार्य असल्याचे म्हटले होते.

या अटीमुळे स्वच्छता सर्वेक्षणात गुण कमी होऊ नयेत, म्हणून महापालिकेने घाईघाईत मोकाट जनावरे पकडण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली. नियुक्ती केली असली, तर मोकाट जनावरे पकडण्यासाठी आवश्यक यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध नव्हती. असे असतानाही जवळपास 34 जनावरांना कोंडवाडा दाखविण्यात आला होता.

यातील काही जनावरांचा लिलावही करण्यात आला. कोंडवाड्यात असतानाही तीन जनावरे मृत्युमुखी पडले. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा पोस्टमार्टेम रिपोर्टही आलेला आहे. मात्र नेमका रिपोर्ट काय आहे, हे सांगण्यास महापालिका तयार नाही. ही प्रक्रिया सुरू असतानाच मोकाट जनावरे पकडण्यासाठी नियुक्ती केलेल्या खासगी संस्थेची मुदत संपुष्टात आली.

महापालिकेकडे जनावरे पकडण्यासाठी यंत्रणा नसल्याने आणि अनेक अडथळे येत असताना त्यात महापालिका सहकार्य करत नसल्याने या संस्थेने आपले काम थांबविले आहे.

संस्थेने काम थांबविल्याने शहरातील विविध चौकांमध्ये पुन्हा मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेले चित्र दिसणार आहे. केवळ रस्त्यावर जनावरे बसतात, एवढ्यापुरताच हा विषय नाही तर त्यांच्यापासून वाहनधारकांना मोठा धोका होणार आहे. अपघातांना आमंत्रण देणारा हा प्रकार नगरकरांसाठी धोकादायक ठरणार आहे.

नगरसेवकांचा ‘मोकाट’ पाठिंबा
महापालिकेच्या सभागृहात मोकाट जनावरांबाबत धायमोकलून ओरडणारे नगरसेवक नगरकरांची काळजी घेताना दिसत असले तरी अप्रत्यक्ष त्यातील काहीजण मोकाट जनावरे आणि त्यांचे मालक यांचे एजंट असल्यासारखे वागत आहेत. मोकाट जनावरे पकडल्यानंतर ते सोडून द्यावेत, यासाठी काही नगरसेवकांनी दबाव आणल्याचे आता समोर आले आहे. एका मोठ्या नेत्याच्या प्रभागातील नगरसेवकाने तर थेट हमरीतुमरीवर येऊन पकडलेली जनावरे सोडवून घेतली असल्याचा किस्साही चर्चेत आहे. नगरकरांच्या जीवाशी खेळणार्‍या या मोकाट जनावरे व त्यांच्या मालकांचा नगरसेवकांना एवढा कळवळा कशासाठी, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com