वाहतूक शाखेच्या आशीर्वादाने शहरात अवजड वाहतूक
Featured

वाहतूक शाखेच्या आशीर्वादाने शहरात अवजड वाहतूक

Sarvmat Digital

अपघातांचे प्रमाण वाढले : रस्त्यांची अवस्था दयनीय

अहमदनगर (प्रतिनिधी)– शहरातून अवजड वाहतुकीस मनाई असतानाही अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू आहे. अवजड वाहनांमुळे दुचाकीसह पायी जाणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहतुकीला पोलिसांचे अभय असल्याचे दिसून येते. गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये अवजड वाहनांनी बळी घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे शहरात अवजड वाहतुकीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासनाकडून कर्मचार्‍यांच्या कमी संख्याबळाचे तसेच बाह्यवळण रस्त्याच्या दुरवस्थेची कारणे दिली जातात. शहर वाहतूक शाखा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर, पुणे, दौंड, मनमाड, कल्याण, औरंगाबाद, विशाखापट्टणम हे महामार्ग शहरातून जातात. या महामार्गालगतच्या शहरातील रस्त्यांवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या वाहनांना शहरातून जाण्यास मनाई असतानाही, पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ही वाहतूक सुरू आहे. बाह्यवळण रस्त्याने थोड्याफार प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक शहरातील महामार्गांवरून सुरू आहे. या वाहनांमुळे शहरातील रस्त्यांवर दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. अवजड वाहने वेगात धावत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

काही दिवसांपूर्वी पत्रकार चौकात टँकरच्या धडकेत तरुण व्यापार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर केडगाव येथील भूषणनगर चौकात कंटनेरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या दोन्ही घटना ताज्या असतानाच उसाच्या ट्रकने एका सायकलस्वाराला चिरडल्याची घटना घडली. तर सावेडी येथेही अशीच घटना घडली. दरम्यान, शहरातून होणार्‍या अवजड वाहतुकीस पोलिसांचे अभय मिळत असल्याचे चित्र आहे. त्याचसोबत शहरातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था असून याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com