रस्त्यावर उतरलेल्यांना कलेक्टर, एसपींनी पुन्हा घरी पिटाळले !
Featured

रस्त्यावर उतरलेल्यांना कलेक्टर, एसपींनी पुन्हा घरी पिटाळले !

Sarvmat Digital

नगरच्या रस्त्यावर पुन्हा गर्दी : दुपारपासून शहराचे प्रवेशव्दारच बंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना ससंर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 144 कलम लागू करतानाच खासगी वाहनांना रस्त्यावर बंदी घातली आहे. मात्र, सोमवारी नगरकरांनी या आदेशाकडे दुर्लक्षित करत रस्त्यावर धाव घेतली. रविवारी दिवसभर घरात बंदिस्त असलेले नगरकर सोमवारी गाड्यासह घरातून बाहेर पडल्याने रस्त्यावर, भाजी मार्केटमध्ये गर्दी झाली. या सर्वांना रस्त्यावर उतरून पुन्हा घरी पिटाळण्याचे काम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी केली.

दरम्यान, सकाळपासून विविध भागात आदेश डावलून घराबाहेर पडलेल्या नगरकरांना पोलिसांनी ‘प्रसाद’ देणे सुरू केले. जिल्ह्याच्या नागरी भागात खासगी वाहने आणि खाजगी प्रवासी वाहनांना प्रतिबंध असतानाही काही नागरिक मोकळ्या रस्त्यांवर येत होते. हे रोखण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी द्विवेदी रस्त्यावर उतरले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह या वाहनचालकांना रोखून त्यांना समज दिली. जे वाहनचालक विनाकारण रस्त्यात फिरत होते, त्यांच्यावर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले.

सोमवारी सकाळीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर शहरातील परिस्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी स्वता बाहेर पडले. जुना बाजार, जुनी महानगरपालिका, प्रोफेसर कॉलनी चौक, दिल्ली गेट, नालेगाव, नेप्ती नाका, जुनी महानगरपालिका यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी प्रत्यक्ष जाऊन विनाकारण रस्त्यावर आलेल्या वाहनचालकांना थांबवले.

पोलीसांना त्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्यास सांगितले. ज्यांच्याकडे योग्य कारण सापडले नाही, अशा वाहनचालकांना दंड करण्यास पोलिसांना सांगितले. तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दलही त्यांच्यावर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हयातील नगर महानगरपालीका, सर्व नगरपालीका, नगरपंचायत व नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे हद्दीमध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी खाजगी वाहने व खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनांना 31 मार्चपर्यंत प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जारी केले होते. मात्र, तरीही विनाकारण रस्त्यांवर फिरणार्‍या या वाहनचालकांना जिल्हाधिकारी द्विवेदी फटकारले आणि समज दिली.

कोरोनाचा संसंर्गच्या पार्श्‍वभूमीवर शहरात खासगी वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यासोबतच प्रशासनाने 144 कलम लागू केले आहे. या कलमातंर्गत रस्त्यावर पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळ्यानांच हा आदेश लागू असला तरी नगरकर आज मोठ्या उत्साहत बाहेर पडले. आदेशाचा कोणताच परिणाम नगरकरांना झाला नसल्याचे आजचे चित्र आहे.

दुकानात गर्दी टाळा…
किराणा दुकान, दूध, फळे, भाजीपाला, पेट्रोल, मेडिकल सुरू असले तरी तेथे गर्दी करण्यास मनाई आहे. शासकीय कार्यालयात देखील 5 टक्के कर्मचार्‍यांवर काम सुरू आहे. 31 मार्चपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तशी ऑर्डर रविवारी काढली.

या गोष्टी करण्यास मनाई
रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, रेंगाळणे यास मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बंदी आहे. दुकाने, खानावळ, मॉल्स, क्लासेस, थिएटर बंद आहेत. विनाकारण रस्त्यावर येण्यास मनाई आहे.

Deshdoot
www.deshdoot.com