नगर : सीनेकाठी चोरांची चलती
Featured

नगर : सीनेकाठी चोरांची चलती

Sarvmat Digital

एका रात्रीत सहा घरफोड्या । पोलिसांना दिले आव्हान

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील सीना नदीकाठी असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरातील वसाहतीमध्ये चोरट्यांनी शुक्रवारी रात्री धुमाकूळ घातला. एक दोन नव्हे तर तब्बल सहा घरांत चोरी करत चोरटे पसार झाले. दुपारपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

आनंदनगर येथील नितीन चंपालाल गादिया, प्रा. प्रफुल्ल राजेंद्र साळवे, प्रवीण कांतीलाल मुनोत, घुले, ज्ञानेश्वर सुदाम माळी आणि उर्जन दशरथ दळे अशी चोरी झालेल्या घरमालकांची नावे आहेत. गुन्हा दाखल झाला नसल्याने नेमका किती ऐवज चोरीस गेला याची माहिती समजू शकली नाही.

गादीया यांचे किराणा दुकान असून चोरट्यांनी त्यातून सुमारे पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समजते. प्रा. प्रफुल्ल साळवे हे शिक्षक असून नातेवाईकाच्या लग्नानिमित्त ते कुटुंबियासह बाहेरगावी गेले होते. प्रवीण मुनोत हे पुण्यात राहतात. देखरेखीसाठी भाडेकरू असूनही त्यांच्या घरात चोरी झाली. ज्ञानेश्वर माळी यांच्या घरातून रोकड चोरीस गेल्याचे समजते. दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

याच आठवड्यात चोरट्यांनी शहरात अनेक ठिकाणी भरदिवसा घरफोड्या करत पोलिसांनाच आव्हान दिले होते. या चोर्‍यांचाच तपास अद्याप लागला नसताना पुन्हा एकाच ठिकाणी सहा घरफोड्या करत चोरट्यांनी ‘डाव’ साधला.

श्वान घुटमळले
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वान काही अंतर पार केल्यानंतर तेथेच घुटमळले. त्यामुळे चोरटे वाहनेने पसार झाले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.

Deshdoot
www.deshdoot.com