Thursday, April 25, 2024
Homeनगरबंदी असतानाही चायना मांजाचा सर्रास वापर

बंदी असतानाही चायना मांजाचा सर्रास वापर

पालिका प्रशासनाने याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- पतंग उडविण्यासाठी वापरात येणार्‍या चायना मांजावर बंदी असतानाही शहरात चायना मांजाचा सर्रासपणे वापर सुरू आहे. या मांजामुळे अनेक नागरिकांबरोबरच पशुपक्षी देखील जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पालिकेने चायना मांजा वापरणारे व विक्रेते यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या चायना मांजा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. यामुळे पक्ष्यांसह दुचाकीस्वार जखमी होत असून शहरात अनेकांना जखमा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चायना मांजावरील बंदी कागदावरच राहिल्याने मांजा जीवावर उठत आहे.

शनिवार, रविवारी शहरातील मैदाने, जवळपासच्या खुल्या जागेमध्ये मुले मोठ्या प्रमाणावर गर्दी करून पतंग उडविण्याचा आनंद घेतात. तसेच संक्रात सणाच्या वेळेस देखील लहान मोठे पतंग उडविण्याचा आनंद घेतात.

पूर्वी पतंग उडवण्यासाठी साध्या सुती दोर्‍याचा वापर केला जात होता. मात्र, हा दोरा तुटत असल्याने आणि स्पर्धेत पतंग कापण्यासाठी आणि आपला पतंग सुरक्षित राहण्यासाठी चायना मांजाचा वापर वाढला. हा दोरा सहजासहजी तुटत नाही. हा दोरा दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती अडकल्यास गळा चिरण्याचा धोका असतो.

तसेच एखादा पक्षी अकडल्यास त्याची सुटका सहजासहजी होत नाही. चायना मांजावर बंदी आणलेली आहे. तरीही श्रीरामपूर शहरात चायना मांजाची सर्रासपणे विक्री व वापर सुरू आहे. तरी पालिका प्रशासनाने चायना मांजा वापरणारे व विक्रेते यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लहुजी सेनेच्यावतीने निवेदन
मकर सक्रांतीस मोठ्या प्रमाणात चायना मांजाची विक्री होत असते. या चायना मांजामुळे यापूर्वी शहरात व तालुक्यात अनेक अपघात घडलेले आहेत. तसेच पशुपक्षांना आपल्या जीवास मुकावे लागले आहे. चायना मांजावर बंदी असताना शहरात व तालुक्यात अनेक विक्रेते चायना मांजाची विक्री करतात. तर त्याचा वापरही सर्रासपणे होतो. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, सचिव हनिफभाई पठाण, अ‍ॅड. रमेश कोळेकर, जिल्हाध्यक्ष रज्जाकभाई पठाण, शेख अहमद निसार, रईस शेख, श्यामकुमार श्रीवास्तव, रमेश खामकर, डॉ. रवींद्र दुर्गे, अहमद पठाण, शुभम बागुल आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या