जनगणना आता मोबाईलवर
Featured

जनगणना आता मोबाईलवर

Sarvmat Digital

संगमनेर (वार्ताहर) – भारत सरकारच्या राष्ट्रीय जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणनेच्या प्रक्रियेत सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांसाठी आता मोबाईलची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीने व मोबाईल वापर करून जनगणना करता येईल. मोबाईलद्वारे जनगणना करणार्‍या कर्मचार्‍याला 25 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

दर दहा वर्षांनी भारत सरकार देशातील नागरिकांची मोजणी करत असते. मागील दहा वर्षाची जनगणना यावर्षी सुरू करण्यात आली आहे. त्या संदर्भातील पूर्वतयारीची प्रक्रिया महसूल विभागाने सुरू केली असून हे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घराची गणती व त्यांची यादी तयार करणे हे काम होणार असून ते 1 मे ते 15 जून या कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे. तर पुढील वर्षी 9 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष व्यक्तींची मोजणी करून नोंदी घेतल्या जाणार आहेत. यासाठी महसूल विभागातील अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. राज्यात या संदर्भाने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आहे करण्यात आलेले आहे.

राज्यात दोन लाख 67 प्रगणक
महाराष्ट्रातील जनगणना करण्यासाठी गटाची निर्मिती करण्यात येते. एका गटात सुमारे 800 व्यक्तींचा समावेश असतो. या 800 व्यक्तींची गणना करण्यासाठी एका प्रगणकाची निवड करण्यात येते. तो प्रगणक संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन व्यक्तींची माहिती शासनाने निर्धारित केलेल्या प्रपत्रात नोंदवत असतो. त्यामुळे राज्यात दोन लाख 67 हजार गट असून तेवढेच प्रगणक काम करणार आहे.

दोन पद्धतीने जनगणना
यावेळी करण्यात येणारी जनगणना दोन्ही प्रकारे करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पारंपरिक पद्धतीने रजिस्टरमध्ये माहिती भरून जनगणना करता येईल तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोबाईलद्वारे देखील जनगणनेचे काम करता येणार आहे. कोणत्या स्वरूपात काम करायचे आहे हे प्रगणकाला स्वातंत्र्य देण्यात आले आहे. जो प्रगणक पारंपरिक पद्धतीने जनगणना करेल त्याला 17 हजार 500 रुपये मानधन देण्यात येईल तर मोबाईलचा वापर करणार्‍या प्रगणकांना 25 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

दोन द्वारे होणार नोंदणी
भारत सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचे अद्ययावतीकरण करण्यासाठी व घर यादी व घरांची मोजदाद करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल प विकसित करण्यात आले आहे. त्याचा वापर सध्या प्रायोगिक तत्वावर करण्याची प्रक्रिया सुरू असून मुंबई, जालना, चंद्रपूर येथे याची चाचणी घेतली जात आहेत. हे दोन्ही इंटरनेट शिवाय ऑफलाईन सुद्धा चालू शकणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com