..तर नवी कोरी गाडीही भंगारात !

..तर नवी कोरी गाडीही भंगारात !

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रदूषणाच्या मुद्द्यावरून बीएस 4 गाड्यांचे इंजिन आता काळाच्या ओघात बाद करण्यात आले आहेत. बीएस 6 या नव्या मानांकनाच्या गाड्या मार्केटला आल्या आहेत. कालबाह्य ठरविलेल्या सर्व बीएस 4 गाड्यांचे रजिस्ट्रेशन 20 मार्चपासून बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती आरटीओ दीपक पाटील यांनी दिली. गाड्यांच्या डिलर्सनी ऑफर दिली अन् स्वस्तात मिळते म्हणून गाडी घेतली तर 20 मार्चपूर्वीच ती रजिस्ट्रेशन करावी अन्यथा ती भंगारात गणली जाणार आहे.

देशभरात बीएस 4 मानकांच्या गाड्या आहेत. या गाड्यांमुळे प्रदुषणास हातभार लागत असल्याने शासनाने या गाड्याच कालबाह्य ठरविण्याचा निर्णय घेत बीएस 6 मानांकन असलेल्या गाड्या रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यापूर्वीच वाहन उत्पादन करणार्‍या कंपन्यांना शासनाने तसे कळविलेही. त्यानंतर कंपन्यांनी या गाड्यांचे उत्पादन करणेच बंद केले. मात्र अनेक शो रूममध्ये या गाड्या अजूनही आहेत. कंपनी या गाड्या परत घेत नाहीत, त्यामुळे ऑफर देत स्वस्तात या गाड्या विक्रीचा फंडा डिलर्सनी घेतला आहे. स्वस्तात गाडी मिळते म्हणून एखाद्याने खरेदी केली तर 20 मार्चपूर्वीच आरटीओंकडे तिची नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर बीएस 4 गाड्यांची नोंदणी केली जाणार आहे. नोंदणी न केलेल्या गाड्या रस्त्यावर दिसल्या तर आरटीओ त्या भंगार समजून स्क्रॅप करणार आहेत. तसे परिपत्रक आरटीओ दीपक पाटील यांनी वाहनांच्या डिलर्सना काल बुधवारी पाठविले आहेत.

प्रदुषणाच्या दृष्टीने इंजिनमध्ये बदल केलेली बीएस 6 मानांकनाची वाहनेच यापुढे नव्याने नोंदणी केली जातील. 20 मार्चपर्यंत बीएस 4 ची नोंदणी करावी. त्यानंतर नोंदणी न झालेली बीएस 4 ची वाहने रस्त्यावर दिसली तर ती स्क्रॅप केली जातील.
दीपक पाटील,
आरटीओ, अहमदनगर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com