Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधी बाकावर बसूनही उत्तम काम करता येते; खा. राऊत यांचा नाव न...

विरोधी बाकावर बसूनही उत्तम काम करता येते; खा. राऊत यांचा नाव न घेता फडणवीसांना टोला

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात विरोधी बाकावर असूनही उत्तमप्रकारे काम करता येते, हे राज्यात असलेल्या सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे,असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हाणला. सरकार आणि विरोधी पक्षनेता असे दोघेही सक्षम असले की राज्यही आनंदात चालते. असे स्पष्ट करतानाच महाविकास आघाडीचे हे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी ते गुरुवारी (दि.26)नाशिकमध्ये आले असता बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार डॉ.भारती पवार, हेमंत गोडसे उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले,शासकीय कार्यक्रमांना जाण्याची सवय नसून नाशिकमधील आपला असा हा पहिलाच कार्यक्रम आहे. अनेक वर्षांपासून नाशिकच्या इमारतीचा प्रश्न रखडला होता. मात्र, त्यालाही नवीन सरकारचीच प्रतीक्षा होती. त्यामुळे कदाचित भूमिपूजनासाठी उशीर झाला असावा. जिल्ह्यातील ही सर्वात उत्तम इमारत उभी राहिल आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करून येत्या वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तिचे लोकार्पण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार फक्त सहा महिने टिकेल, असे ज्यांना वाटते, त्यांनी आता सत्तेची आशा सोडून द्यावी, असा टोलाही भाजपला लगावला. भाजप सरकारने बजेट वाढवण्यासाठी नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण केले नाहीत.त्यामुळे राज्यातील तिजोरीवर त्याचा बोजा पडला आहे.

मात्र, याविषयी विद्यमान सरकार माहिती घेत आहे. याच्या फार खोलातही जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

या प्रसंगी आमदार नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, सरोज अहिरे, नितीन पवार,सुहास कांदे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे,जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित,सभापती यतींद्र पगार, मनीषा पवार, सुनीता चारोस्कर,अर्पणा खोसकर यांसह जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
.
रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हाती शोभायचा

महाविकास आघाडी सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’मातोश्रीवरून शरद पवार यांच्या हाती गेला का?असा प्रश्न उपस्थित केला असता राऊत यांनी स्पष्टपणे नकार दिला. शरद पवार यांच्या कामाची पद्धत पूर्णत: वेगळी आहे. लोकशाही मूल्यांना धरून काम करण्यात त्यांची हातोटी असल्यामुळे रिमोट कंट्रोल त्यांच्या हाती गेला असे म्हणणे चुकीचे ठरेल. रिमोट कंट्रोल हा बाळासाहेबांच्या हातीच शोभत होता,असेही खा. राऊत म्हणाले.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन सर्वोत्कृष्ट

छगन भुजबळ यांनी दिल्लीत फूकटात उभारलेले महाराष्ट्र सदन ही इमारत सर्वोत्कृष्ट असून, महाराष्ट्राबाहेरील व्यक्ती दिल्लीत आल्यानंतर तिचे तोंडभरुन कौतुक करते. कायम स्मरणात राहिल अशी इमारत उभी राहिली म्हणून महराष्ट्र सदन दिल्लीत उठून दिसते, अशा शब्दात भुजबळांची प्रशंसा राऊत यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या