शिर्डी : तरुणाचा खून एकजण ताब्यात; गुन्हा दाखल
Featured

शिर्डी : तरुणाचा खून एकजण ताब्यात; गुन्हा दाखल

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

शिर्डी | प्रतिनिधी

शिर्डी परिसरातील पिंपळवाडी रोड शिवारात काल किरकोळ कारणावरुन तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे. शिर्डी शहरातील भिमनगर परिसरात राहणारा विठ्ठल साहेबराव मोरे हा तरुण एमएच 17 एए 674 या मोटारसायकलवरुन पिंपळवाडी रोडवरुन घराकडे जात असताना श्रीकांत राजू शिंदे याने त्याच्याकडील एमएच 17 बीके 1100 या इनोव्हा कार चालवत असताना साईड देण्याच्या कारणावरुन या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात त्याने जातीवाचक शिवीगाळ केली. बाचाबाची पर्यावसन हाणामारीत झाले. या बाचाबाचीनंतर श्रीकांत याने त्याची कार सुरु केली आणि गाडीखाली आला. त्यात विठ्ठल मोरे याचा खून करण्यात आला.

याप्रकरणी मयताचा मामेभाऊ कृष्णा शेजवळ याने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि नं. 60/2020 नुसार श्रीकांत राजू शिंदे याचेविरुध्द भादंवि कलम 302, अ. जा. प्रतिबंधक कायदा कलम 3(1) (आर) (एस) 3 (2) (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटना घडल्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस उपअधिक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे पोलीस निरीक्षक गोकूळ औताडे, पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दात्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते यांनी भेट देवून चौकशी केली. याप्रकरणी पुढील तपास प्र. पोलीस निरीक्षक गोकूळ औताडे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com