सिन्नर : मेंढपाळ आई व मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
Featured

सिन्नर : मेंढपाळ आई व मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

सिन्नर | वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील बाबळेश्वर येथील मात्र व्यवसायानिमित्त मिठसागरे येथे स्थाईक झालेल्या मेंढपाळ कुटुंबातील आई व मुलाचा पांगरी येथील जाम नदीपात्रात पाण्याने भरलेल्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मूळचे श्रीरामपूर तालुक्यातील राऊत कुटुंब मेंढपाळी च्या व्यवसायानिमित्त मीठसागरे येथे गेल्या दहा वर्षांपासून वास्तव्यास आहेत. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास पांगरी मिठसागरे दरम्यान जाम नदीपात्रालगत मेंढ्या चारत असताना आई शोभा बाळासाहेब राऊत (३५) व मुलगा गोविंद (१९) शेतकऱ्यांच्या निदर्शनास पडले होते.

मुलाने आंघोळ करायची असल्याने कपडे मोबाईल बाजूला काढून ठेवत डोहात उडी मारली. मात्र, या ठिकाणी पंधरा ते वीस फूट खोल पाणी असल्याने अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहून त्याला वाचवण्यासाठी आई शोभा हिने देखील पाण्यात उडी मारली. ते दोघेही पाण्यात बुडाले. ही बाब तासाभरानंतर गोरख कासार या शेतकऱ्याच्या लक्षात आली. कासार यांच्या कांद्याच्या पिकात मेंढ्यांचा कळप आल्याचे पाहून त्यांनी धाव घेतली असता मेंढ्या सोबत कोणीही मेंढपाळ आढळून आला नाही.

काही शेतकऱ्यांनी या मेंढ्या राऊत यांच्या असल्याचे सांगितल्यावर त्यांची शोधाशोध सुरू झाली. मोबाईलवर फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी नदीपात्र कडे वळले. त्यांना काही अंतरावर गोविंद चे कपडे व मोबाईल आढळून आला. संशय बळावला व नदी पात्रात शोध घेतला असता दोघांचे मृतदेह पाण्यात बुडाले आढळून आले.

Deshdoot
www.deshdoot.com