Thursday, April 25, 2024
Homeनगरशेवगावच्या शाखा अभियंत्यामुळे ‘झेडपी’त तणाव

शेवगावच्या शाखा अभियंत्यामुळे ‘झेडपी’त तणाव

करोना अहवाल पॉझिटिव्हपूर्वी त्यांनी नगरला हजेरी लावल्याची चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – दोन दिवसांपूर्वी शेवगाव पंचायत समितीच्या बांधकाम खात्यातील शाखा अभियंता यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. करोना पॉझिटिव्ह येण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात हजेरी लावली होती. यामुळे जिल्हा परिषदेमधील अधिकारी आणि कर्मचारी तणावात आले आहेत.
जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह येण्याचा सिलसिला सुरूच आहे. विशेष करून ग्रामीण भागात हळूहळू करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. यामुळे दहशतीचे वातावरण असून त्यातच आता शासकीय कर्मचार्‍यांना करोनाची लागण होत असल्याने सरकारी कार्यालयांत देखील चिंता वाढली आहे. संगमनेर तालुक्यात एका नायब तहसीलदाराला करोना झाल्याचे समोर आल्यानंतर आता शेवगावची केस समोर आली आहे.

- Advertisement -

नगरला जिल्हा परिषद मुख्यालयाच्या इमारतीला चारही बाजूंनी करोनाने घेरले आहे. माळीवाडा, रेल्वेस्टेशन परिसर, मार्केट यार्ड या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या भागांमध्ये शहरात रुग्ण आढळले असून, अजूनही तेथे हा सिलसिला सुरूच आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण असताना जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात मात्र गर्दीचे सम्राज्य असते. याबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर जिल्हा परिषदेला जाग आली. मुख्यालयात कामे नसतानाही येणार्‍यांना बंधने लावण्यात आली. मात्र, आता शेवगावचे शाखा अभियंता यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात तणावाचे वातावरण आहे.

संबंधित अभियंता शेवगाव येथून औरंगाबाद येथे रोज जाऊन-येऊन करत असल्याची चर्चा आहे. त्यांना शेवगाव येथे भाडोत्री खोली घेतल्याचेही सांगण्यात येते. दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते औरंगाबाद येथे गेले. तेथे त्यांची तपासणी केली असता, त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. याची माहिती शेवगाव पंचायत समितीत मिळताच, तेथे धावपळ उडाली. त्यांच्याशी संपर्क आलेले गटविकास अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी अशा नऊ जणांची तपासणी करण्यात येत आहे.

केवळ शेवगाव पंचायत समितीच नव्हे, तर जिल्हा परिषदेतही याची माहिती मिळताच अनेकांची भंबेरी उडाली. कारण संबंधित अभियंत्याने करोना अहवाल येण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात हजेरी लावल्याची चर्चा आहे. यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यातील विविध भागांतून पंचायत समितीचे कर्मचारी, विविध ठिकाणी फिरणारे राजकारणी, त्यांचे कार्यकर्ते, अभ्यागत यांची सतत गर्दी असते. शेवगाव येथील अभियंता करोना पॉझिटिव्ह आल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विनाकारण येणार्‍यांवर बंधने न घातल्यास भविष्यात जिल्हा परिषद सील करण्याची वेळ येईल, अशा शब्दांत येथील कर्मचारी आणि अभ्यागत आपला संताप व्यक्त करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या