Friday, April 26, 2024
Homeनगरसरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात करोना रुग्ण वाढले – आ. विखे

सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात करोना रुग्ण वाढले – आ. विखे

लोणी (प्रतिनिधी)- करोना संकटातून महाराष्ट्राला वाचविण्यात राज्य सरकार संपूर्णत: अपयशी ठरले असून, सरकारच्या नाकर्तेपणामुळेच राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारचे आपत्ती व्यवस्थापन फक्त आधिकार्‍यांच्या भरवश्यावर सुरू असून, मंत्री फक्त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्त व्हीडीओ कॉन्फरन्सिंगवर दिसते अशी टीका माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयासमोर आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. शिर्डी मतदार संघातील सर्वच गावांमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या घराच्या अंगणात महाराष्ट्र बचाव आंदोलन करून आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा मास्क बांधून आणि काळे झेंडे दाखवून निषेध केला. लोणी बुद्रुक येथे झालेल्या आंदोलनात अण्णासाहेब म्हस्के, चेअरमन नंदू राठी, सोसायटीचे चेअरमन चांगदेव विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे,उपसरपंच अनिल विखे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अनिल विखे याप्रसंगी उपस्थित होते.

- Advertisement -

राज्यात पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीने 76 हजार बेडची उपलब्धता करण्याची सूचना सरकारला केली होती. परंतु आघाडी सरकार फक्त तात्पुरत्या उपाययोजना करत बसले. केंद्र सरकारने दिलेले पीपीई किटही डॉक्टर्स, नर्स आणि पोलीस दलापर्यंत पोहचले नाहीत. उलट पोलिसांवर हल्ले होत असताना सरकारमधील मंत्र्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.

करोना संकटातच शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या याचेही सरकारला भान राहिले नाही. हे सरकार जनतेत दिसण्यापेक्षा व्हीडीओ कॉन्फरन्सिंगवर अधिक दिसते, फक्त फेसबुकवर संवाद साधते, या सरकारचे आपत्ती व्यवस्थापन हे केवळ आधिकार्‍यांच्या भरवश्यावर सुरू असल्याची टीका करून, आ.विखे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी भाजपच्या आंदोलनावर केलेल्या टिकेचा समाचार घेताना आ. विखे पाटील म्हणाले की, काँग्रेसचे अस्तित्वच आता कुठे दिसत नाही. त्यामुळे त्यांनी भाजपची चिंता करू नये, नगर जिल्ह्यात सरकारचे तीन मंत्री असतानाही जिल्ह्यातील जनतेला हे दिलासा देऊ शकले नाहीत, शेतकर्‍यांसह जिल्ह्यातील जनता यांनी वार्‍यावर सोडली असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या