भाजपच्या तीन जिल्हाध्यक्षांची शुक्रवारी निवड
Featured

भाजपच्या तीन जिल्हाध्यक्षांची शुक्रवारी निवड

Sarvmat Digital

शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी गांधी विरोधकांची फिल्डिंग

अहमदनगर (प्रतिनिधी) – भाजपला आता जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्ष मिळणार असून, या तिनही जिल्हाध्यक्षपदांसाठी शुक्रवारी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत निवड होणार आहे. सर्वाधिक चुरस शहर जिल्हाध्यक्षपदासाठी होण्याची चिन्हे आहे.

भाजपच्या संघटनात्मक निवडीची सध्या धांदल सुरू आहे. पक्षाने यासाठी खा. गिरीश बापट यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र तब्येतीच्या कारणावरून त्यांच्याऐवजी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती करण्यात आली. आता 10 जानेवारीला दुपारी दीड वाजता ही निवड होणार आहे. यामध्ये शहर जिल्हाध्यक्ष, दक्षिण जिल्हा अध्यक्ष आणि उत्तर जिल्हा अध्यक्ष अशा तिघांची निवड होणार आहे. यातून भाजपमधील अंतर्गत वाद उफाळण्यास सुरूवात झाली आहे.

सर्वात गोंधळाची स्थिती शहर जिल्हाध्यक्षपदासाठी आहे. या पदावर सध्या माजी खा. दिलीप गांधी आहेत. त्यांचीच पुन्हा वर्णी लागावी, यासाठी त्यांचे समर्थक प्रयत्नशील असल्याचे समजते. मात्र मागीलवेळी स्पर्धेत असलेले माजी नगरसेवक सचिन पारखी, नगरसेवक महेंद्र गंधे यांनीही बाह्या सरसावल्या आहेत. गांधी विरोधी गट शहरात मोठा आहे. या सर्वांचा पारखी यांना पाठिंबा आहे. पारखी आणि गंधे यांची उमेदवारी सहमतीने असण्याची शक्यता आहे. दोघांपैकी एक कोणीही चालेल, अशातला हा प्रकार आहे.

पारखी व त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते सदाशिव देवगावकर, वसंत लोढा यांनी आज मुंबईत जाऊन पक्षाच्या नेत्यांची भेट घेत पारखी यांच्यासाठी गळ घातल्याचे समजते. त्यांच्यासमवेत मुंबई भेटीसाठी गंधे नसले, तरी हे दोघे एकत्रच असल्याचे सांगण्यात येते. गांधी विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांचे वजन देखील पारखी यांच्याच पारड्यात पडणार असल्याचे समजते. खा. डॉ. सुजय विखे यांची भूमिका काय राहणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत पारखी, गंधे आणि गांधी विरोधकांनी त्यांना दिलेली साथ पाहता ते आपल्या बाजुने कौल टाकतील, असा विश्वास पारखी, गंधे यांना आहे.

उत्तरेसाठी चुरस
नव्याने निर्माण होत असलेल्या उत्तर जिल्हा अध्यक्षपदासाठी नितीन कापसे, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, राजेंद्र गोंदकर यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये सध्यातरी जालिंदर वाकचौरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. जिल्हा परिषदेत त्यांनी पक्षासाठी केलेले काम, पक्षवाढीसाठी अकोलेसारख्या आदिवासीबहूल भागात केलेला संघर्ष यासह नुकतेच भाजपमध्ये आलेले माजी आ. वैभव पिचड यांची साथ ही त्यांची बलस्थाने आहेत. गोंदकर आणि कापसे हे देखील भाजपचे जुने कार्यकर्ते असल्याने त्यांच्या नावावरही विचार होऊ शकतो. तसेच प्रकाश चित्ते यांच्या नावाचीही चर्चा आहे. या निवडीतही ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

नगर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदासाठी सध्यातरी विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांचेच नाव येत आहे. ऐनवेळी एखादे नाव येऊ शकते. प्रा. बेरड यांच्या पाठीशी माजी मंत्री राम शिंदे यांचा भक्कम हात असतो. मात्र नव्या समिकरणात या दोघांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाल्याचे समजते. त्यामुळे ऐनवेळी दुसरे नाव आल्यास येथेही स्पर्धा होऊ शकते. मात्र बेरड यांचे काम पाहता त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

जिल्ह्याच्या 7 मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर

श्रीरामपूर, अकोले, राहाता, पारनेरच्या निवडी रेंगाळल्या

अहमदनगर- प्रदेश भाजपाची मान्यता घेण्यात येऊन विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील भाजपाच्या 11 मंडळांच्या अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

या मंडळाध्यक्षांच्या निवडीसाठी जिल्हा कोअर समितीची बैठक जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडली. यावेळी माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी पालकमंत्री राम शिंदे, आ. मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी आ. चंद्रशेखर कदम व शहर जिल्हाध्यक्ष माजी खा. दिलीप गांधी उपस्थित होते.

जिल्ह्यात एकूण 17 मंडळे आहेत. त्यापैकी यापूर्वी श्रीगोंदा आणि कर्जत मंडळाच्या अध्यक्षांच्या निवडी झालेल्या आहेत. काल 7 मंडळाच्या अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यात संगमनेर शहर-राजेंद्र सांगळे, संगमनेर ग्रामीण-डॉ. अशोध इथापे, कोपरगाव ग्रामीण साहेबराव रोहम, नेवासा नितीन दिनकर, शेवगाव-ताराचंद लोंढे, पाथर्डी-माणिक खेडकर, राहुरी -गणेगावचे सरपंच अमोल भनगडे यांचा समावेश आहे. निवडी न झालेले मंडळे- श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, अकोले, राहाता, पारनेर, नगर ग्रामीण, जामखेड, कोपरगाव शहर.

Deshdoot
www.deshdoot.com