Saturday, April 27, 2024
Homeनगरभोकरला शेतकर्‍यांनीच लावला पिंजरा

भोकरला शेतकर्‍यांनीच लावला पिंजरा

भोकर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील भोकर व कारेगाव शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असतानाही या प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भोकर शिवारात शेतकर्‍यांनीच स्वखर्चाने पिंजरा आणून लावला आहे. मात्र या पिंजर्‍यास गेल्या तीन दिवसांपासून बिबट्या हुलकावणी देत आहे. तर काल भरदिवसा ऊस तोडणी मजुरालाच उसाच्या शेतात बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

भोकर शिवारातील जगताप वस्ती व खानापूर रोड परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. एका आठवड्यात या बिबट्याने जगताप वस्ती परिसरातील चंदू मुठे यांचा एक बोकड व सचिन विठ्ठल शेळके यांचा एक बोकड फस्त केला. त्यानंतर याच परिसरातील बाबासाहेब बनकर, दीपक शेळके व अण्णासाहेब शेळके या शेतकर्‍यांचे मिळून तीन कुत्रे या बिबट्याने फस्त केले. याबाबत शेतकर्‍यांनी वनरक्षक यांना अनेकदा माहिती देऊनही अद्यापपर्यंत वनविभागाचे कुणीच या परिसरात फिरकले नाही.

- Advertisement -

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते दीपक शेळके व अण्णासाहेब शेळके यांनी वन विभागाशी संपर्क करून स्वखर्चाने शेजारच्या तालुक्यातून बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा आणला. परंतु वनविभागाने त्याच्याकडे पाठ फिरविल्याने या शेतकर्‍यांनी स्वत:च या परिसरातील अण्णासाहेब शेळके यांच्या (गट नं.550) शेतामध्ये पिंजरा लावला, त्यात भक्ष्यही ठेवले परंतु या पिंजर्‍यास बिबट्या हूल देत आहे. त्यामुळे शेतकरी हातबल झाले आहेत.

गेल्या आठवड्यात कारेगाव शिवारातील गणेशखिंड रोड लगत शेती असलेले प्रेस फोटोग्राफर बाळासाहेब ठोकळ हे रात्री दोन वाजेच्या सुमारास शेतात चालले असता. रस्त्यावर अचानक त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. सुदैवाने श्री.ठोकळ व त्यांचे सहकारी दोघेही चारचाक़ी वाहनात होते. या दरम्यान ठोकळ यांनी सुमारे तीन मिनिटांचे व्हिडिओ चित्रीकरण करून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केला पण तरीही या परिसरातही वनविभागाने भेट दिली नाही.

एकंदरितच बिबट्याच्या दहशतीखाली या भागातील नागरिक असल्याने वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाषराव पटारे यांच्यासह शेतकर्‍यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या