भेंडा-कुकाणा पाणीपुरवठा योजनेचे कर्मचारी उद्यापासून संपावर

भेंडा (वार्ताहर)- येथील भेंडा-कुकाणा व इतर चार गावांसाठी असलेल्या संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी वाटप संस्था भेंडा-कुकाणा व इतर चार गावे या पाणीपुरवठा योजनेवर काम करणारे पाच कर्मचारी वेतनवाढ लागू करण्याच्या मागणीसाठी उद्या गुरूवार दि.20 फेब्रुवारीपासून संपावर जात आहेत.

संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी वाटप संस्थेकडे एकूण सहा कर्मचारी दरमहा 7500 रुपये मानधनावर काम करत आहेत. संस्थेच्या दिनांक 1 नोव्हेंबर 2019 रोजीचे सभेमध्ये या कर्मचार्‍यांच्या पगारात दरमहा प्रत्येकी 1000 रुपये वाढ करण्याचा ठराव मंजूर झालेला आहे. परंतु या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी न झाल्याने त्यांना पगारवाढ मिळालेली नाही.त्यामुळे या सर्व कर्मचार्‍यांनी दि. 20 फेब्रुवारी 2020 पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. निवेदन तहसीलदार नेवासा, गटविकास अधिकारी पंचायत समिती, सरपंच तसेच पाणी वाटप संस्था यांना देण्यात आले आहे.

सहा गावांच्या नळपाणी पुरवठा विस्कळीत होणार?
सहा कर्मचारी संपावर गेल्यास भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, कुकाणा, तरवडी, चिलेखनवाडी व अंतरवाली या सहा गावांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. साठवण तलावातील पाणी पंपिंग करून शुद्धीकरण केंद्रात घेऊन पाण्याचे शुद्धीकरण करणे, ते पाणी मुख्य साठवण टाकीत साठवणे आणि त्या त्या गावांच्या पाणी टाक्यांमध्ये पाणी पोहचविणे पर्यंतची कामे हे कर्मचारी करत असतात. हे सर्व कर्मचारी संपावर गेल्यास जनतेला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

का रखडली पगारवाढ ?
कर्मचार्‍यांना विमा संरक्षण दिले पाहिजे असा शासनाचा निर्णय आहे. कर्मचारी विमा हप्त्याची रक्कम पगारातून न घेता संस्थेने ती रक्कम भरावी यावर अडून बसलेले आहेत. विमा हप्ता संस्थेने भरण्याची तरतूद नाही. त्यामुळे जोपर्यंत विमा हप्ता पगारातून भरण्यास कर्मचारी तयार होत नाही तोपर्यंत नवीन पगारवाढ लागू होणार नाही असा संस्थेचा निर्णय आहे.
– दौलतराव देशमुख अध्यक्ष,
संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी वाटप संस्था


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *