Thursday, April 25, 2024
Homeनगरमाजी आमदार मुरकुटे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा

माजी आमदार मुरकुटे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा

मात्र मुरकुटे यांचा इन्कार; कारखान्याच्या कामासाठी भेटल्याचा खुलासा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घरवापसी केल्याची चर्चा काल शहरात सुरू होती, मात्र याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताचे खंडण केले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची जोरदार चर्चा काल शहरात सुरू होती. सोबत खा. पवार यांच्या सोबत पुष्पगुच्छ घेऊन छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या वृत्ताला पुष्टी मिळत होती, मात्र मुरकुटे यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. गेल्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीनंतर नाराज झालेल्या माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी तालुक्यात स्वतंत्र लोकसेवा विकास आघाडीची स्थापना केली होती.

या आघाडीच्या माध्यमातून त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना ताकद दिली होती, तसेच विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर मुरकुटे यांनी कांबळे यांना स्थानिक उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र या दोन्हीही निवडणुकीत कांबळे यांचा पराभव झाला.

या निवडणुकीनंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात की काय? याबाबत चर्चा सुरु होती. काल अशा आशयाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यांच्यासोबत माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, हिंमत धुमाळ, लव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र या वृत्ताची खात्री करण्यासाठी प्रत्यक्षात भ्रमणध्वनीवर माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्याशी संपर्क साधला असता, आपण बँक व कारखान्याच्या कामासाठी शरद पवार यांना भेटलो असल्याचा खुलासा त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या