भंडारदरा धरणाच्या मजबुतीकरणाचा अभ्यास सुरू
Featured

भंडारदरा धरणाच्या मजबुतीकरणाचा अभ्यास सुरू

Sarvmat Digital

भंडारदरा (वार्ताहर) – उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाच्या मजबुतीकरणासाठी काय करता येईल यासाठी सरकार नियुक्त कमिटी अभ्यास करीत आहे. या कमिटीतील सदस्यांनी आतापर्यंत तीन-चार वेळा या धरणाची पहाणी केली आहे.

भंडारदरा धरणातून काही प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. तसेच व्हॉल्वमध्येही काहीवेळा तांत्रिक दोष निर्माण होतो. तसेच अन्य काही प्रश्नांसाठी सरकारने या धरणाच्या अभ्यासासाठी कमेटी नेमलेली आहे. या कमेटीने डिसेंबर, जानेवारीत आणि आता काही दिवसांपूर्वी भंडारदरा धरण येथे भेट देऊन पाहणी केली आणि माहिती घेतली. या कमेटीकडून या धरणाच्या मजबुतीकरणाची आवश्यकता आहे की नाही याचा अभ्यास केला जात आहे.

ही कमेटी याबाबतचा अहवाल सरकारला सादर करेल. त्यानंतर सरकार यासंदर्भातील निर्णय घेईल असे सांगण्यात आले. प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले भंडारदरा धरण आहे. याचं मूळ नाव विल्सन डॅम आहे. याच धरणातील पाण्यावर अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यांसह राहुरी आणि नेवाशातील काही भागातील हजारो एकर शेतीला पाणी मिळते. तसेच या भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध होते. या धरणातील पाण्यावरच या भागातील शेतीचे नियोजन केले जाते. या धरणातील पाण्यामुळेच या भागात सुबतत्ता प्राप्त झालेली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com