बँकेतून पैसे काढण्यास विरोध केल्याने मॅनेजरला शिवीगाळ
Featured

बँकेतून पैसे काढण्यास विरोध केल्याने मॅनेजरला शिवीगाळ

Sarvmat Digital

माजी पंचायत समिती उपसभापतींविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – खातेदार व त्याची सही, अंगठा नसताना बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून माजी पंचायत समिती उपसभापती प्रताप उर्फ बाळासाहेब भास्कर नलगे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोळगाव येथील शाखेतील व्यवस्थापक व रोखपाल यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद व्यवस्थापक रोहन उबाळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिल्याची घटना काल गुरुवार दि.15 रोजी घडली. याबाबत त्यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब नलगे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबतचा गुन्हा बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल झाला.

याबाबत सविस्तर असे की फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब नलगे हे बबन मोहरे यांच्या समवेत बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बँकेच्या कोळगाव शाखेत आले व त्यांनी बबन मोहरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या खात्यातून रक्कम रुपये 700 काढण्यासाठी पावती भरून दिली. मात्र त्यावर खातेदाराचे सही किंवा अंगठा नसल्याने बँकेचे व्यवस्थापक उबाळे यांनी खातेदार समक्ष हवे किंवा आजारी असल्यास तसा दाखला द्यावा किंवा आमच्या कर्मचार्‍याला त्यांची सही घेण्यासाठी प्रत्यक्ष पाठवतो असे म्हटले.

याचा नलगे याला राग आला व त्यांनी उबाळे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बँक तुझ्या बापाची आहे का बँकेच्या बाहेर ये तुझ्याकडे पाहतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी रोखपाल पोपट सरोदे हे मध्ये पडले असता नलगे याने त्यांनाही शिवीगाळ करत त्यांच्यावर चप्पल उगारली. त्यामुळे सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक रोहन उबाळे यांच्या फिर्यादी वरून बेलवंडी पोलीस ठाण्यात माजी उपसभापती प्रताप उर्फ नलगे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com