बँकांच्या सलग सुट्ट्यांमुळे ब्राम्हणी, जखणगावची कर्जमाफी सोमवारी
Featured

बँकांच्या सलग सुट्ट्यांमुळे ब्राम्हणी, जखणगावची कर्जमाफी सोमवारी

Sarvmat Digital

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत केलेल्या कर्जमाफीसाठी प्रायोगिक चाचणीसाठी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी आणि नगर तालुक्यातील जखणगाव या गावांची निवड केली होती. याठिकाणी गुरूवारी (दि.20) जिल्हा बँकेतील सर्व खातेदारांची प्रायोगिक तत्वावर कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र, शुक्रवार (21) पासून बँकांना सलग सुट्ट्या असल्यामुळे ही प्रक्रिया सोमवारी (दि.24) राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 30 सप्टेंबर 2019 अखेरच्या थकित व पुनर्गठित केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जास कर्जमाफी मिळणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीचे काम जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीची कर्जमाफी योजना ही आधारबेस आहे. त्यामुळे थकीत कर्जदार शेतकर्‍यांचे आधार लिंक करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. कर्जदारांना आधार प्रामाणिकरणासाठी बोयोमेट्रिक मशिन जिल्हा बँकेच्या 297 शाखांत उपलब्ध करण्यात आले आहेत.

काल गुरूवारी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी आणि नगर तालुक्यातील जखणगावात असणार्‍या जिल्हा बँकेच्या खातेदारांची कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. यात ब्राम्हणी गावात जिल्हा बँकेचे 848 खातेदार शेतकरी आणि जखणगावात बँकेचे 143 शेतकरी सभासद यांच्या कर्जखात्यावरील कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार होती. मात्र, शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने राबविण्यात येणार्‍या या कर्जमाफीच्या चाचणी प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता असल्याने बँक बंद राहिल्यावर कर्ज खात्यावर पैसे टाकणे अशक्य असल्याने आता ही प्रक्रिया सोमवार (दि.24) राबविण्यात येणार आहे. यावेळी संबंधीत गावातील आपलं सरकार केंद्रावर देखील कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची नावे टाकण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com