अयोध्येतील राममंदिर समितीवर राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी यांची नियुक्ती
Featured

अयोध्येतील राममंदिर समितीवर राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी यांची नियुक्ती

Sarvmat Digital

बेलापूर (वार्ताहर)- सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्येत उभारण्यात येणार्‍या प्रभू श्रीराम मंदिर समितीचे विश्वस्त म्हणून बेलापूरचे भूमिपुत्र स्वामी गोविंददेव गिरी यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी येथील मंदिर उभारणीचा मार्ग जवळपास पाचशे वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मार्गी लागला. लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. या मंदिराच्या विश्वस्तांची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यात बेलापूर येथील राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांचा जन्म बेलापूर येथे 1949 मध्ये व्यास परिवारात झाला.

त्यांचे 11 वी पर्यंत शिक्षण जे. टी. एस. हायस्कूल मध्ये झाले. कांची कामकोटीचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांच्याकडून स्वामींनी अनुग्रह घेतला. तसेच स्वामी सत्यमित्रानंद महाराज यांच्याकडून संन्यास दिक्षा घेतली. भागवत, रामायण, महाभारत, श्रीमद्भगवद्गीता आणि अन्य धर्मग्रंथांचे देश विदेशात प्रबोधन करून संपूर्ण आयुष्य राष्ट्रधर्म आणि अध्यात्मासाठी समर्पित केले आहे.

स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पांडुरंग शास्त्री आठवले यांचे विद्यार्थी व प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे ते सहयोगी आहेत. त्यांच्या धार्मिक कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. त्यांच्या नियुक्तीने बेलापूरला थेट देशपातळीवर सन्मान मिळाला आहे. ही बातमी समजताच बेलापूर पंचक्रोशीत आनंद व्यक्त करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com