अवकाळी पुन्हा मानगुटीवर !
Featured

अवकाळी पुन्हा मानगुटीवर !

Sarvmat Digital

श्रीरामपूर तालुक्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस; विजेचा कडकडाट

आश्वी परिसरात गहू भुईसपाट

हरभरा, ज्वारी, कांदा, लसूण पिकांसह बहार धरलेल्या डाळिंब बागा धोक्यात

श्रीरामपूर/राहाता/संगमनेर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर, राहाता, संगमनेर तालुक्यांतील अनेक भागांत शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी धास्तावला आहे. या अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने आगास केलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, लसूण आदी पिकांना मोठा धोका निर्माण होणार आहे. बहार धरलेल्या डाळिंब बागांना फुटवे फुटण्याच्या भीतीने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अवकाळी पावसाच्या हजेरीने बळीराजा धास्तावला आहे. सप्टेबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता देशोधडीला लागला. या नुकसानीतून सावरत नाही तोच आता पुन्हा अवकाळीचे संकट येऊन ठेपले आहे.

शनिवारी श्रीरामपूर शहरासह लगतच्या टिळकनगर, दत्तनगर तसेच तालुक्यांतील नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव, सराला-गोवर्धन, निमगाव खैरी परिसरात सुमारे 1 तासापेक्षा जास्त वेळ झिमझिम पाऊस झाला. तसेच गोंडेगाव, खानापूर, माळवाडगाव, भामाठाण, मातुलठाण, पढेगाव, बेलापूर, मातापूर, भोकर, खोकर, टाकळीभान, घुमनदेव, वडाळा महादेव यासह अनेक भागात पावसाची रिमझिम झाली. उंदीरगाव परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचा गहू जमिनीवर झोपला आहे.

वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे हा परिसर अंधारात होता. खैरी निमगाव येथे शनिवारचा बाजार दिवस होता. अचानक ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने भाजीपाला विक्रेत्यांसह, खरेदीदारांसह सर्वांची तारांबळ उडाली. प्रथमच रात्री उशिरापर्यंत भाजीपाला विक्रेते, कापड, किराणा, भेळ विक्री करणारे थांबले मात्र तरीही काही खरेदीदारांना भाजीपाला मिळाला नाही. पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता. या पावसामुळे दुचाकीस्वार तसेच पादचार्‍यांचीही धावपळ झाली. शहर व परिसरात रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पावसाची रिमझिम सुरु होती.

काल सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. मात्र सायंकाळच्या सुमारास अचानक रिमझिम पाऊस सुरु झाला. अनेक ठिकाणी विजेचा कडकडाट सुुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस शक्यता जाणवत होती. सध्या आगास केलेली ज्वारी, हरभरा, कांदा पिके काही भागात काढणीस आलेली आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस झाला तर या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. दरम्यान, चालू वर्षी रब्बी हंगामात पुरेशा प्रमाणात थंडी पडली नाही तसेच सतत ढगाळ हवामान राहिल्याने अगोदरच सर्वच पिके रोगराईने ग्रासलेली आहे. चालू वर्षी मोठा खर्च औषध फवारणीवर झालेला आहे. त्यामुळे त्याचा फटका उत्पन्नातून जाणवणारच आहे. असे असताना आता अवकाळीचे संकट आल्याने शेतकरी धास्तावला आहे.

राहाता तालुक्याच्या पूर्व भागात दाणादाण

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता तालुक्यातील लोणी कोल्हारसह पूर्व भागातील चितळी, जळगाव, वाकडी, धनगरवाडी, रांजणगाव, गणेशनगर, एकरुखे परिसरात काल सायंकाळी अचानक आलेल्या सुमारे दीड तास अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली. शनिवारी संध्याकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस सुरू झाला. वाकडी, धनगरवाडी परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस झाल्याने शेतमध्ये व गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

चितळी, जळगाव, रांजणगाव, एकरुखे, गणेशनगर परिसरातही अचानक गारांसह आलेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, डाळिंब, कांदा, गहु, हरबरा व इतर रब्बी हंगामी पिकांचे नुकसान होणार आहे. कोल्हार परिसरात तुरळक पाऊस झाला. मात्र लोणीत पावसाने चांगलाच जोर धरला होता. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप हंगामात सोयाबीन, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातून सावरुन शेतकर्यांनी रब्बी हंगामात कांदा, गहु, मका, हरभरा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती तसेच द्राक्षे, डाळिंब पिकांचेही शेतकर्यांनी नियोजन केले होते मात्र शनिवारी अचानक आलेल्या पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बहार धरलेल्या डाळिंब बागांना फुटणार फुटवे, उत्पादक हवालदिल

अस्तगाव (वार्ताहर) – अवकाळी पावसाने अस्तगाव परिसरात अर्धा तास हजेरी लावली. या पावसाने डाळिंब बागा, गहू, हरभरा, मका यांना मोठा फटका बसला आहे. चोळकेवाडी भागात हरभर्‍याच्या आकाराच्या गारा पडल्या आहेत. डाळिंब पिकाला याचा मोठा फटका बसला आहे. बहार धरलेल्या बागांना विशेषत: मोठा फटका बसला आहे.

काल दुपारनंतर हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. वातावरणात कमालीचा बदल झाला. पाऊस येणार नाही, असे वाटत असतानाच सायंकाळी 6 वाजता पावसाने दमदार सुरुवात केली. अर्धातास चांगला पाऊस झाला. या पावसाबरोबरच हरभर्‍याच्या आकाराच्या गाराही पडल्या. राहाता तालुक्याच्या पूर्व भागात तसेच दक्षिण भागात पावसाने दमदार आगमन केले. मात्र हा पाऊस पिकांना बाधक असल्याचे शेतकर्‍यांच्या म्हणणे आहे. या पावसाने अस्तगाव परिसरातील फळबागांना मोठा फटका बसला आहे. डाळिंब पिकांना ताण देणे सुरू होते. परंतु अचानक आलेल्या पावसाने चोळकेवाडी भागात चक्क एक भरणी झाली आहे. ज्या शेतकर्‍यांनी छाटणी केली होती, ते बाग लिक झाले. लवकरच त्यांना फुटवा फुटणार असल्याने ते लवकर येतील. ज्यांनी छाटणी केली नाही, त्यांचेही बाग लिक झाले. त्यामुळे त्यांना बहार धरण्यास अडचण येईल, असे डाळिंब उत्पादक शेतकरी ज्ञानदेव चोळके यांनी सांगितले. डाळिंब उत्पादनावर यंदा मोठा परिणाम होऊ शकतो, असे जाणकार शेतकरी सांगतात.

हरभर्‍याचे पिक परिपक्व झाले असताना या पावसाने घाट गळ होऊ शकते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. वारा असल्याने गहू काही ठिकाणी लोळला आहे. त्याच बरोबर जीव पडलेल्या गव्हाचे उत्पादन कमी होईल, असे शेतकरी सांगतात. उभ्या मका पिकांना याचा फटका बसू शकतो. कांद्यालाही हा पाऊस पोषक नाही, कांदा पिकावर ही याचा परिणाम होऊ शकतो. इतर भाजीपाला पिकावर यांचा परिणाम होऊ शकतो. द्राक्षे पिकांनाही मोठा फटका बसणार आहे. असे राजेंद्र पठारे यांनी सांगितले.

आश्वी परिसरात गहू भुईसपाट

आश्वी (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील आश्वीसह परिसराला शनिवारी सायंकाळी सुमारे तासभर मुसळधार पाऊसाने झोडपून काढले. बेमोसमी पावसामुळे अनेक ठिकाणी गहू भूईसपाट झाल्याचे चित्र दिसत होते, असे आश्वी वार्ताहर कळवितो. शनिवारी सकाळी थंडी होती. तर दुपारी आभाळ आल्याने हवेत उष्णता वाढल्याने गरम होत होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे आश्वीसह परिसराला एकाच दिवशी हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन ऋतू अनुभवायला मिळाले आहेत. तासभर सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी, नागरीक, ऊस तोड कामगार व मजूंराची चागलीच धादंल उडाली होती. या पावसामुळे आश्वी बुद्रुक येथील शेतकरी योगेश रातडीया यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या काढणीला आलेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान यावेळी काही काळासाठी वीज पुरवठा खंडीत झाला होता.

Deshdoot
www.deshdoot.com