ऑडिट झालेल्या 3 लाख शेतकर्‍यांची नावे पोर्टलवर
Featured

ऑडिट झालेल्या 3 लाख शेतकर्‍यांची नावे पोर्टलवर

Sarvmat Digital

20 तारखेनंतर कर्जमाफीची पहिली यादी होणार प्रसिध्द

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा बँकेच्या 3 लाख 9 हजार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे सरकारी लेखापरिक्षकांकडून ऑडिट पूर्ण झाले आहेत. या शेतकर्‍यांची नावे सरकारच्या कर्जमाफीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. अपलोड करण्यात आलेल्या यादीची सरकार पातळीवर पुन्हा तपासणी होऊन, त्यात पात्र शेतकर्‍यांची नावेच ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, येत्या 20 फेबु्रवारीला अथवा त्यानंतर कर्जमाफीची पहिली यादी प्रसिध्द होणार असल्याची माहिती सहकारी विभागातील सुत्रांनी दिली.

राज्यात महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. यात 2 लाखांपर्यंतचे पीककर्ज तसेच कर्ज पुनर्गठण माफ केले जाणार आहे. या कर्जमाफीसाठी जिल्हा प्रशासन व सहकार खात्याने शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांना त्यांचे आधार क्रमांक लिंक केले आहेत. त्याचसोबत पात्र असणार्‍या शेतकर्‍यांच्या खात्याचे सरकारी लेखा परिक्षकांकडून ऑडिट करण्यात आले. यात संबंधीत शेतकर्‍यांची कर्ज कोणत्या कालावधीत घेतलेले आहे. त्या कर्जावर बँकांनी आकारलेले व्याज याची माहिती घेण्यात आली. यासह विविध कार्यकारी सेवा संस्थांकडून 28 विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने थकबाकीतील शेतकर्‍यांची माहिती संकलित करण्यात आली होती.

जिल्हा बँकेच्या 3 लाख 9 हजार कर्जदार शेतकर्‍यांच्या खात्याचे ऑडिट पूर्ण झाले असून या शेतकर्‍यांची यादी पोर्टलवर टाकण्यात आली आहे. यात यातील 469 खाते अपलोड करतांना तांत्रिक अडचणी आली असून 263 खाते टाकणे बाकी आहे. मात्र, हे काम लवकरच संपणार आहेत. दरम्यान सरकार अपलोड केलेल्या यादीतून संबंधीत शेतकर्‍यांच्या आधार क्रमांकानूसार तो कर्जमाफीस पात्र आहे की नाही, हे ठरविणार आहे.

कर्जमाफीच्या निकषातून सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, बाजार समितीसह अन्य शासकीय समित्यावरील प्रतिनिधी, कर भरणारे शेतकरी यांना वगळण्यात आलेले आहे. सरकार पातळीवर होणार्‍या तपासणी या सर्वांना कर्जमाफीच्या यादीतून वगळण्यात येणार असून त्यानंतर स्वतंत्र पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची यादी तयार करण्यात येणार आहे.

दरम्यान, नगर जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांची यादी संकेतस्थळावर अपलोडचे काम झालेले आहे. यामुळे पहिल्याच टप्प्यात जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांची यादी प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकराच्या नियोजनानुसार जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधून ऑडीट पूर्ण करणार्‍या शेतकर्‍यांची नावे सरकारच्या संकेत स्थळावर टाकण्यासाठी 1 ते 15 फेबु्रवारीपर्यंत मुदत होती. त्यानंतर पुढील पाच दिवसांत याद्यांचे प्रामाणिकरण करून 20 फेबु्रवारी अथवा त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची पहिली यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सहकार विभागातील सुत्रांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com