Friday, April 26, 2024
Homeनगरअस्तगावात जमावबंदी आदेशाला काहींचा ठेंगा

अस्तगावात जमावबंदी आदेशाला काहींचा ठेंगा

नेपाळचे ते कुटुंब नॉर्मल, मलेशियातून आलेला रांजणगाव खुर्दचा एक जण एकांतवासात

अस्तगाव (वार्ताहर)- अस्तगावला कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जमावबंदी (कलम 144) असतानाही काहीजण सकाळी 11 वाजता घोळक्याने बाजारतळावर, मारुती मंदिरासमोरील प्रांगणात गप्पा मारताना दिसून आले. त्यातील अनेकांनी तोंडाला मास्क अथवा रुमालही बांधलेला नव्हता. याठिकाणी चोरून दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा तसेच ग्रामपंचायत प्रामाणिक प्रयत्न करत असताना काहीजण मात्र त्या आदेशाला हरताळ फासताना दिसून येत आहेत. बाजारतळावर अनेकजण लिंबाच्या झाडाखाली बसल्याचे दिसून आले. याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार एका चहा विक्रेत्याने सकाळी बराच वेळ आपले चहाचे दुकान चालू ठेवले होते. बाजारतळानजीक असलेल्या दारू विक्रेत्यांच्या अड्ड्याजवळ अनेक अमृतरावांची गर्दी पाहायला मिळाली.

याशिवाय काही तरुण बंद दुकानासमोरील बाकड्यांवर मोबाईलशी खेळताना दिसून आले. चाळीसवाडी भागातील काही रहिवाशी रस्त्याच्याकडेला एकत्र येऊन गप्पा मारताना दिसून आले. तसेच पाणी योजनेच्या फिल्टर टाकीजवळही अनेक टोळके बसलेले असतात. सकाळी पोलिसांनी राऊंड मारला. मात्र पोलीस गेल्यानंतर मोठ्या थाटात या टोळ्या फिरताना दिसून आल्या.

ग्रामपंचायत गर्दी टाळण्यासाठी पोलिसांच्या संपर्कात आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मगर, विलास जेजूरकर, पोलीस पाटील राजेश त्रिभुवन, चोळकेवाडीचे पोलीस पाटील प्रदीप चोळके हे ग्रामपंचायतीत ठाण मांडून होते. ग्रामपंचायतीने लाऊड स्पिकर लावून ग्रामस्थांना गर्दी न करण्याचे तसेच कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत होते.

दरम्यान अस्तगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असणार्‍या रांजणगांव खुर्द येथील मलेशियाहून आलेल्या एका तरुणाला कॉरंटाईन होण्यास सांगितले आहे. असे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र गोर्डे यांनी सांगितले.

नेपाळवरून आलेल्या त्या कुटुंबाला नगर येथे तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांना तपासणीनंतर सोडून देण्यात आले आहे. त्यांना बाधा नसल्याचे निष्पन्न झाल्याने ते अस्तगाव येथे आले आहेत. तसेच गावात परराज्यातून, परदेशातून, परजिल्ह्यातून येणारास मनाई करण्यात आली आहे. असे जरी असले तरी गावातील काहीजण ही शिस्त पाळत नाहीत.

त्यांना या आजाराचे गांभीर्य नसल्याने ते मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातही काही रुग्ण तोंडाला मास्क बांधून असतात तर काहींनी साधा रुमाल सुध्दा बांधलेला दिसून आला नाही. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन रुग्णांना व तपासणीस आलेल्यांना तोंड बांधून घेेण्यास सांगितले. त्यानंतर तोंड बांधून घेण्यात आले.

जीवनावश्यक यादीत किराणा दुकाने असली तरी दिवसभर दुकाने सुरू आहेत. या दुकानांत कारण नसताना मोठी गर्दी गप्पा मारण्यासाठी दिसून येते. खरे तर कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून किराणा दुकानातील गर्दीला काही होणार नाही असे नाही. तर तालुका प्रशासन, पोलीस ठाणे तसेच ग्रामपंचायतीने किराणा दुकानदारांनाही वेळेचे बंधन घालून द्यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान आज मंगळवारी असणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. मागीलवेळी बाजार बंद असतानाही तो मूळ जागेवर न भरवता शाळेजवळ भरविण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या